मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इयत्ता दहावीच्या पेपर मध्ये कॉपी करु दिली नाही या रागातून विद्यार्थ्यांनी शिक्षकावर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे. पेपर सुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकाला लक्ष्य केले. या हल्ल्यात शिक्षक जखमी झाला आहे. शिक्षक निलेश दिनकर जाधव यांच्या डोक्याला डोल्याला मार लागला आहे. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत. बोर्डाचे दहावीचे पेपर सुरु असल्याने निलेश जाधव हे सुपरव्हिजनचे काम करीत होते.
पेपरची वेळ संपल्यावर आपले काम संपवून शिक्षक जाधव हे घरी जात होते. त्याचवेळी शाळेच्या बाहेर विद्यार्थ्यांच्या घोळक्यातून काही विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली. त्यात ते जखमी झाले. याप्रकरणी मनमाड पोलिसांनी सायंकाळी अज्ञात विद्यार्थां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
राज्यात सध्या कॉपीमुक्त अभियान राबविले जात आहे. याअंतर्गत इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपीला पूर्णपणे आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे. मात्र, कॉपीची कीड काही दूर होत नसल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या विविध भागात विविध प्रकारच्या घटना समोर येत आहेत.
इयत्ता दहावीचा सोमवारी, (२० मार्च) विज्ञान २ विषयाचा पेपर होता. शहरातील एच ए के हायस्कूलमध्ये शिक्षक जाधव हे सुपरव्हिजनचे कार्य करीत होते. शिक्षक जाधव हे कलाशिक्षक आहेत. परीक्षेदरम्यान जाधव यांनी काही विद्यार्थ्यांनी कॉपी करण्यास मज्जाव केला. त्याचाच राग मनात धरुन संबंधित शिक्षकांनी थेट हल्ला केला आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शाळेबाहेर मोठा गोंधळ उडाला. रक्तबंबाळ अवस्थेतच जाधव हे पोलिस स्टेशनमध्ये गेले. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
हल्ल्यानंतर शिक्षक जाधव म्हणाले
इयत्ता दहावीच्या परीक्षेत मी सुपरव्हिजन करीत होतो. मी माझे कामकाज करीत होतो. बोर्डाच्या सूचनेनुसार, मी विद्यार्थ्यांना कॉपी करु दिली नाही. काही विद्यार्थ्यांना मज्जाव केला. याचाच राग विद्यार्थ्यांना आला. त्यांनी पेपर संपल्यानंतर शाळेच्या गेटजवळ दगडफेक केली. हे विद्यार्थी गणवेशातच होते. माझ्या डोक्याला दुखापत झाली आहे. या प्रकरणी मी मनमाड शहर पोलीसांकडे तक्रार दिली आहे.
Nashik Manmad Student Attack on Teacher Copy Case