नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील आंबेडकर ट्रक टर्मिनल भागात भरधाव मालट्रकने दिलेल्या धडकेत ५६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मोहम्मद नूर हसन (रा.कोमटेगल्ली,गुरूद्वाराजवळ पंचवटी) असे मृत इसमाचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून मालट्रक चालकास अटक करण्यात आली आहे.
हसन हे रविवारी (दि.३) सायंकाळच्या सुमारास आडगाव येथील ट्रक टर्मिनल भागात रस्त्याच्या कडेला उभे असतांना हा अपघात झाला. ट्रक टर्मिनलच्या दिशेने भरधाव जाणा-या मालट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पोलिस दप्तरी गुह्याची नोंद करण्यात आली असून चालक भिमसिंग रामसिंग पाटील (रा.पार्वती कॉर्नर,कमलनगर हिरावाडी) यास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक अरूण पाटील करीत आहेत.
मालेगावात गांजा विक्रेत्याला अटक
शहरातील सलामताबाद परिसरात किल्ला पोलिसांनी छापा मारत तीन किलो गांजा जप्त केला आहे. सलामताबाद परिसरात शब्बीर मोहम्मद हुसैन ही व्यक्ती गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापा मारत त्याच्या घरातून गांजाच्या पुड्यासह तीन किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी शब्बर मोहम्मद हुसैन याला पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री प्रकरणी अटक केली आहे.
जुलै महिन्यात नाशिकमध्ये गांजा या अमलीपदार्थाची खरेदी – विक्री करणा-या दोघांना पोलिसांनी गजाआड केले होते. या कारवाईत अॅटोरिक्षासह दुचाकी आणि गाजांचा साठा असा सुमारे साडे तीन लाखाचा ऐवज हस्तगत करुन दिनेश भाऊसाहेब पाटोळे (३२ रा. लोहशिंगवे ता.जि.नाशिक) व राजेश राजाराम गार्दुल (२५ रा.गिता चौक,अंबड) यांना अटक केली होती. विशेष म्हणजे या कारवाईत गोणीत ओलसर पान व फुल बिया आणि देठ असलेल्या गांजाचा साठा मिळून आला होता. जिल्ह्यात अनेक ठिकाणी गांजा विक्री होत आहे. त्याबरोबरच अनेक अंमली पदार्थही विकले जात असतात. पण, त्यावर फारशी कारवाई होत नाही. आता पोलिसांनी याकडे लक्ष देणे सुरु केले असून त्यांनी अंमली पदार्थ विक्री करणा-यांवर कारवाई करण्याचे सत्र सुरु केले आहे. त्यामुळे हा व्यवसाय करणा-यांचे धाबे दणाणले आहे.
Nashik Malegaon Crime Accident Death Ganja