नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत यांसाठी – शुक्रवार १६ ऑगस्ट २०२४ ला नाशिक जिल्हा बंदची हाक नाशिक जिल्हा सकल हिंदू समाजाने दिली आहे.
बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाने प्रचंड हिसक वळण घेतल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचे त्यागपत्र राष्ट्रपतीकडे सोपवून देशातून पलायन केले. बांगलादेशातून आरक्षणाच्या प्रश्नावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे. या हिंसाचाराचे रुपांतर आता अराजकतेत झाले आहे. सरकार विरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले आहे. बांगलादेशात २७ ठिकाणी हिंदुना लक्ष करण्यात आले. जाणीव पूर्वक हिंदूना लक्ष करून त्यांच्या उघडपणे हत्या करणे, हिंदुंच्या घरांवर आक्रमण करणे, हिंदूंची दुकाने लुटणे, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे, हिदू महिलांवर बलात्कार करणे, हिंदुना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहते. हिंदू नगरसेवकांची हत्या झाली. एका हिदू पत्रकारांची हत्या झाली. या गोष्टीमुळे तेथील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात बांगलादेशी सैन्यदलाने जरी हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले असेल, तरी ‘भारत सरकारने त्यावर विसंबून न राहता हिंदू समाजाच्या आणि मंदिरांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत.
या अराजक परिस्थितीतून हिंदूंना संरक्षण मिळावे, या संदर्भात नाशिक जिल्हा येथील सर्व हिंदू संघटना, राजकीय पक्ष आणि हिंदू नागरिक यांचे एकजुटीने सकल हिंदू समाज नाशिक जिल्हाच्या वतीने, शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी संपूर्ण नाशिक बंद ची हाक देवून आवाहन करत पुढील मागण्या करीत आहोत.
१. बांगलादेशातील हिंदूवरील हल्ले, घरांची लुट, मंदिरांवरील हल्ले, मूर्तीची तोडफोड, महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी तेथील सैन्य दलाला कठोर सुचना द्याव्यात.
२. बांगलादेशातील हिंदूवरील वाढते हल्ले लक्ष्यात घेता तेथील हिदुना सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि त्यांना तातडीने सुरक्षा पुरवावी.
३. आतापर्यंत तेथील हिंदूंच्या जीवित वा मालमत्ता याची जी हानी झाली असेल, त्याची तातडीने ‘भरपाई करावी.
४. बांगलादेशातील हिसाचारामुळे तेथील जे हिंदू विस्थापित होऊन भारतात आश्रय मागत असतील, त्यांना नागरिकत्व सुधारणा कायद्या’ द्वारे (CAA) भारत सरकारने आश्रय द्यांवा.
५. तसेच यापुर्वीही जवळपास ५ कोटी बांगलादेशी घुसखोर भारतात शिरले आहेत, या घटनेनंतर पुन्हा ही घुसखोरी वाढण्याची शक्यता पाहता भारतीय सीमेवर चोख बंदोबस्त करावा.
‘सोशल मीडिया’ च्या माध्यमातून बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराचे जे भयंकर व्हिडीओ समोर येत आहेत त्यावरून भारत सरकारने वेळीच लक्ष न घातल्यास बांगलादेश हा दुसरा पाकिस्तान होण्याची शक्यता आहे. यामुळेच जिहादी आतंकवादी यांचे मनोबल वाढून ते भारतातही त्यांच्या छुप्या पद्धतीने हिसाचार माजवण्याची दाट शक्यता आहे.
या सर्व उपरोक्त मागण्यासाठी सकल हिदू समाज नाशिक जिल्हा बंदचे आवाहन करत असताना नाशिक शहराच्या परिसरात ठिकठिकाणी साधारणतः दुपारी १२ ते २ या वेळेत उभे राहून हातात फलक घेवून निदर्शने करणार आहोत आणि तेथून मा. जिल्हाधिकारी साहेब, नाशिक यांना संबंधित निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दुचाकी वाहनावरून मार्गस्थ होणार आहोत.
बंदला यांचा पाठिंबा
या बंदला नाशिकमधील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सनातन, हिंदू जनजागृती समिती, समविचारी संघटना राजकीय पक्ष म.न.से, भाजपा, हिंदू एकता आंदोलन पक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे व उबाठा) तसेच सर्व हिंदुत्ववादी संघटना यांनी पाठींबा जाहीर केला आहे.
सकल हिदू समाज, नाशिक जिल्हा