नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लहवित येथील रहिवासी आणि लष्कराच्या तोफखाना विभागात सिक्कीममध्ये कार्यरत असलेले लान्स नायक संतोष विश्वनाथ गायकवाड यांना वीरमरण आले आहे. आसाममधील लंका येथे ते ड्युटीवर असताना ही घटना घडली आहे. गायकवाड यांचा पार्थिवावर लहवित येथे लष्करी इतमामात बुधवारी (२६ ऑक्टोबर) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड हे लंका (जि. होजाई, आसाम) येथे कार्यरत होते. हा सर्व भाग बर्फाळ प्रदेश आहे. अतिशय कडाक्याची थंडी येथे असते. कधी कधी तर उणे १५ ते २० म्हणजेच रक्त गोठविणारी थंडी असते. या कडाक्याच्या थंडीतच गायकवाड यांची तब्ब्येत बिघडली. त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना तत्काळ उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली. गायकवाड यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुली, मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे.
ऐन दिवाळीच्या सणातच लहवित येथील गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गायकवाड हे शेतकरी कुटुंब आहे. बुधवारी दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेचा सण साजरा होणार असतानाच याच दिवशी गायकवाड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, लहवितच्या जवानाला वीरमरण आल्याने लहवित पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
Nashik Indian Army Jawan Death in Sikkim
Santosh Gaikwad