नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरात पुन्हा एकदा आयकर विभागाचे छापे सुरू झाले आहेत. गेल्या महिन्यात विविध बिल्डरांच्या तब्बल ५०हून अधिक ठिकाणांवर छापे टाकण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. आज पहाटेच आयकर विभागाचे पथक शहरातील एका औद्योगिक कंपनीत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, निमा पॉवर या औद्योगिक प्रदर्शनाला आजपासून प्रारंभ होत असतानाच आयकर विभागाने औद्योगिक कंपनीवर छापा टाकला आहे.
आयकर चुकवेगिरीसह विविध आर्थिक बेकायदा उलाढालींची दखल घेत आयकर विभागाकडून संशयास्पद ठिकाणांवर छापे टाकले जातात. गेल्यावेळी नाशकातील बिल्डर रडारवर होते. एकाचवेळी विविध बिल्डर्सच्या तब्बल ५० हून अधिक ठिकाणांवर छापे पडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर बरेच दिवस आयकर विभागाचे काम या ठिकाणांवर सुरू होते. त्यातील कारवाईची अद्याप माहिती आयकर विभागाने जाहीर केलेली नाही. असे असतानाच आता आयकरचे पथक पुन्हा शहरात धडकले आहे.
नाशिक शहरात दाखल झालेले पथक हे पुण्याचे असल्याचे सांगितले जाते. सातपूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या शारदा मोटर्स या कंपनीमध्ये आयकर विभागाचे पथक दाखल झाले आहे. चारचाकी वाहनांचे सुटे भागांचे उत्पादन या कंपनीत केले जाते. आज सकाळच्या सुमारासच आयकरचे पथक कंपनीत दाखल झाले. या कारवाईचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही.
शारदा मोटर्स या कंपनीच्या बाहेर आयकर विभागाची कार उभी आहे. तसेच, या कंपनीच्या बाहेर मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1659447072985337858?t=pid2eNh8CUTCSzvAtbQJJA&s=03
Nashik Income Tax Department Raid