नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील अनाधिकृत वृक्षतोडबाबत नाशिक महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडुन वेळोवेळी कारवाई केली जाते. या मोहिमेची मनपाच्या सहा विभागात काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे पथक वृक्षतोडीच्या घटनांकडे लक्ष ठेवीत आहे. ही मोहीम आता आणखी कडक केली जाणार आहे.
1 फेबुवारीपासूनची आकडेवारी पाहता मनपाचे सहा विभाग मिळून एकूण 17 गुन्हे दाखल झाले आहेत. अनधिकृतपणे वृक्ष तोडणा-यांकडून 23 लाख 71 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. सर्वाधिक सहा गुन्ह्यांची नोंद पश्चिम विभागात झाली असून एकूण 6 लाख 65 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. पंचवटी विभागात सर्वात कमी एक गुन्हाची नोंद झाली असून एक लाख 75 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.
मनपाच्या पथकाने रविवारी 12 मार्च रोजी सातपूर विभागातील आनंदवल्ली शिवारात 45 फुट उंचीचे गुलमोहराचे डेरेदार झाड तोडून लाकूड घेऊन जाणारे वाहन मोठ्या शिताफीने पकडले होते. त्यातील दोन टन वजनाचा लाकूडफाटा पथकाने ताब्यात घेतला आहे. उप आयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष प्राधिकरण निरीक्षक किरण बोडके, आर. बी. सोनवणे, वैभव वेताळ, जगदीश लोखंडे, मुख्य माळी श्रीकांत इरनक यांचा सहभाग असलेल्या पथकाने ही कारवाई केली होती.
विभागनिहाय गुन्ह्यांची संख्या, दंड
नाशिक पश्चिम – 6 गुन्हे – 6 लाख 65 हजारांचा दंड
पंचवटी – 1 गुन्हा – एक लाख 75 हजारांचा दंड
नवीन नाशिक – 2 गुन्हे – 3 लाख 35 हजारांचा दंड
नाशिक पूर्व – 4 गुन्हे – 2 लाख 71 हजारांचा दंड
सातपूर – 2 गुन्हे – 3 लाख 40 हजारांचा दंड
नाशिक रोड – 2 गुन्हे – 5 लाख 85 हजारांचा दंड
एकूण – 17 गुन्हे – 23 लाख 71 हजारांचा दंड
नागरीकांना आवाहन
शहरातील नागरीकांनी, सोसायटीमधील रहिवाश्यांनी, प्लॉटधारकांनी वृक्ष छाटणी आणि वृक्ष तोडण्याकरीता मनपाच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडुन रितसर परवानगी घेऊनच कार्यवाही करणे आवश्यक आहे. अन्यथा महानगरपालिकेकडून कायदेशीर कारवाई करुन दंड आकारण्यात येत आहे. तशी मोहिम शहरात राबवली जात आहे, असे आवाहन मनपा उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे उप आयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी केले आहे.
https://twitter.com/my_nmc/status/1635617778446262272?s=20
Nashik Illegal Tree Cutting 17 FIR 23 Lakh Fine