नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महानगर पालिका व नववर्ष स्वागत यात्रा समिती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांच्या चौथ्या दिवशी, फाल्गुन अमावस्या १९४४, मंगळवार (दि.२१) मार्च रोजी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन म्हणजेच मृत्युंजय दिनानिमित्त तरुणांमध्ये स्वत्व जागरण करण्याच्या हेतुने शिवकालीन शस्त्र विद्या व भारतीय व्यायामांचे प्रात्यक्षिके सायं. ६ वाजता आणि शिवकालिन शस्त्रे प्रदर्शनी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत पाडवा पटांगण गोदाघाट येथे मांडण्यात आली.
‘शिवकालीन विविध प्रकारचे शस्त्रे’ आबालवृद्धांना जवळून बघता यावी व हाताळता यावी या उद्देशाने शस्त्रास्त्रांची प्रदर्शनी’ मांडण्यात आली होती. या शस्त्र प्रदर्शनात भाल्यांचे विविध प्रकार, पट्ट्यांचे विविध प्रकार, तलवारींचे विविध प्रकार, कुऱ्हाडीचे विविध प्रकार, चिलखत, वाघ नखे, विळे, खुरपे, कट्यारी व ढाली हे प्रदर्शनात मांडण्यात आले होते.
या शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी ९ वाजता सव्यसाची गुरुकुलाचे लखन जाधव गुरुजी, दांडेकर दीक्षित तालीम संघाचे अध्यक्ष हिरामण नाना वाघ, नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे यांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, समितीचे सचिव योगेश गर्गे, संघटक जयंत गायधनी व उपाध्यक्ष राजेश दरगोडे देखील उपस्थित होते.
तर सायंकाळी ६ वाजता, महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर ‘भारतीय व्यायाम आणि प्रात्याक्षिके’ हि कोल्हापूर येथील सव्यसाची गुरुकुलाचे श्री. लखन जाधव गुरुजी आणि त्यांचे विद्यार्थी यांनी सादर केली. यावेळी नाशिक महानगर पालिकेचे उपायुक्त तथा गोदावरी संवर्धन कक्ष प्रमुख डॉ. विजयकुमार मुंढे, उपायुक्त नितीन नेर, शहर अभियंता शिवकुमार वंजारी हे अधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर इस्कॉन नाशिकचे शिक्षाष्टकम् प्रभु, एसीबी नाशिकच्या शर्मिष्ठा घारगे, एसीबी उपायुक्त वैशाली पाटील, अर्थतज्ञ विनायक गोविलकर, तसेच जेष्ठ पत्रकार डॉ. वैशाली बालाजीवाले, जेष्ठ पत्रकार जयप्रकाश पवार व जेष्ठ पत्रकार अभिजित कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शहरातील दांडेकर दीक्षित तालीम संघाचे अध्यक्ष पै. हिरामण नाना वाघ, नाशिक शहर तालीम संघाचे अध्यक्ष पै. संजय आप्पा चव्हाण, पै. उत्तम दळवी, पै. संदीप निकम, पै. दीपक जुन्डे, पै बाळू काकड, पै. बाळू नवले, सुप्रिया तुपे, गोरखनाथ बलकवंडे या पैलवानांचा सत्कार देखील करण्यात आला. तसेच यावेळी मनपा तर्फे सव्यसाची गुरुकुलाचे लखन जाधव गुरुजी यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप देऊन विशेष सत्कार केला.
त्यानंतर भारतीय व्यायाम पद्धतीचे सादरीकरण सुरु झाले, त्यात सुरुवातीला सर्वांगसुंदर व्यायाम, सूर्यनमस्कार, भूमीनमस्कार, चंद्रनमस्कार, भारतीय दंड – बैठक सादर करण्यात आली त्यानंतर शस्त्र विद्येच्या प्रत्याक्षिकांमध्ये भारतीय युद्धशास्त्र भूमिका, युद्धकला प्रात्यक्षिके, व समारोप भूमिका सादर करण्यात आली.
त्या नंतर वंदे मातरम म्हणून कार्यक्रम संपन्न झाला. दीपक भगत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन सुनेत्रा मांडवगणे यांनी केले. तर शस्त्र विद्या प्रदर्शन व प्रात्याक्षिके या कार्यक्रमाचे समन्वयन रोहित गायधनी व ओंकार कर्पे यांनी केले. तसेच शिवाजी बोंदार्डे, जयेश क्षेमकल्याणी, विनायक चंद्रात्रे, रोहित गायधनी, प्रसाद गर्भे, महेश महांकाळे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.
Nashik Gudhi Padva Shiv Era Weapons’ Presentation