संपत चाललेली वाचन संस्कृती कुठेतरी रुळावर यावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कै.मु.श.औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय नाशिक येथे दि. २४ व २५ नोव्हेंबर, २०२२ रोजी ‘ग्रंथोत्सव २०२२’ चे आयोजन करण्यात आले होते. परंतु, या आयोजनात महत्वाच्या असणाऱ्या शासकीय कार्यालयांनी केवळ एक सोपस्कार उरकायचा म्हणून घेतलेले परिश्रम आणि पुस्तक वाचनाच्या मुळ क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आहे म्हणून सार्वजनिक वाचनालयाला (अर्थात सावानाला !) या शासकीय विभागांनी सोबत घेवून या कार्यक्रमाचा एक सहआयोजक बनवले होते त्या सावानाने फक्त ‘जागामालक’ म्हणून घेतलेली भूमिका यामुळे हा ग्रंथोत्सव हेतू साध्य करण्यात किती सफल झाला? हा संशोधनाचा विषय ठरतो आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक वाचनालय अशी एकापेक्षा एक सरस अशी आयोजकांची नावे ज्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरील बॅनरवर झळकत होती त्या ‘ग्रंथोत्सव २०२२’ च्या आयोजनात खरा प्रेक्षक शोधायला मात्र अडचणी येत होत्या.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण, २०१० अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे या ग्रंथोत्सवासाठी शासन निर्णय क्र.
पूरक २०२२/प्र.क्र. ८०/२०२२/साशि ५ दि. २१.०९.२०२२ नुसार राज्यभरातील ३६ जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांना एकूण रू. ४५,९९,०००/- इतका निधी वितरीत करण्यात आला होता. तो समप्रमाणात वाटण्यात यावा असे शासनाचेच आदेश असल्याने नाशिकच्या ग्रंथोत्सवासाठी तो रू. १,२७,७५०/- इतका निश्चीतपणे मिळाला असावा. शासनास अपेक्षीत असलेला ग्रंथोत्सवामागचा उद्देश हा वर नमुद शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमुद करण्यात आलेला आहे. तो उद्देश असा आहे की, “ग्रामीण व शहरी भागातील जनतेच्या वाचनसंस्कृतीमध्ये वाढ व्हावी या हेतून ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी ग्रंथ प्राप्त व्हावेत तसेच प्रकाशक व ग्रंथविक्रेता यांना ग्रंथविक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी” ग्रंथोत्सव २०२२ मध्ये मात्र या संपुर्ण मुळ हेतूलाच हरताळ फासल्याचे दिसून आले. एक ग्रंथदिंडी, कार्यक्रमस्थळी ५ ते ६ प्रकाशकांनी लावलेले निवडक पुस्तकांचे स्टॉल्स, एक कविसंमेलन, एक व्याख्यान आणि एक संगीतमय कार्यक्रम या व्यतिरीक्त या ग्रंथोत्सवाचा उद्देश सफल होईल असा कोणताही कार्यक्रम या ग्रंथोत्सवात नव्हता.
ग्रंथदिंडी शालेय मुलांच्या सहभागामुळे फुलून निघाली होती. त्यानंतर उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मंत्रीमहोदय येणार असल्याने हा कार्यक्रम दणक्यात होणेही सहाजिक होते. त्यानंतर निमंत्रित कवींचे कवी संमेलन पार पडले. निमंत्रित कवींनी या संमेलनात दर्जेदार कविता सादर केल्या. परंतु, त्या कवितांचा रसास्वाद घ्यायला नाशिकचा दर्दी प्रेक्षकच उपस्थित नव्हता. नाशिकचा माध्यमिक शिक्षण विभाग हा इतर अनेक आयोजकांपैकी एक आयोजक असल्याने काही शाळेच्या विद्यार्थ्यांना उपस्थिती सक्तीची केली गेली आणि त्यामुळे निदान या हॉलच्या अर्ध्या खुर्च्यांवर गणवेशातले शालेय विद्यार्थी तरी बसलेले दिसले. अखेरीस या कवी संमेलनात बोलावलेल्या काही निमंत्रीत कविंना खास मुलांसाठीच्या कविता सादर करण्याचा मार्ग निवडावा लागला. उरलेल्या खुर्च्यांपैकी अर्ध्या खुर्च्यांवर संबंधीत खात्याचे कर्मचारी, शिक्षक यांची उपस्थिती होती. दुसऱ्या दिवशीच्या सत्रात “वाचनसंस्कृती व ग्रंथांचे महत्व” या विषयावर दोन मान्यवर अभ्यासकांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रत्यक्षात या व्याख्यानाला एका व्याख्यात्याने दांडी मारली. सत्र पार पडले खरे, परंतु हव्या त्या प्रतिसादाशिवाय. इथेही प्रेक्षकांना खेचून आणण्यात आयोजक अपयशी ठरल्याने अभ्यासपुर्ण व्याख्यानाची फलोत्पत्ती काय? असाच प्रश्न विचारला गेला. ज्या लोकांमध्ये वाचनसंस्कृती वाढावी म्हणून प्रयत्न करण्यासाठी हा कार्यक्रम होता ते लोक किंवा ते प्रेक्षकच या कार्यक्रमात मिसींग होते आणि मग प्रेक्षकांचे स्वरूप बघितल्यानंतर इतके पैसे खर्च करण्याऐवजी हा कार्यक्रम कमी पैशात एखाद्या शाळेत का घेतला गेला नाही? हा प्रश्न देखील पुढे आला.
खरे तर पुस्तक, ग्रंथ, पुस्तकांचं वाचन, वाचन संस्कृती हा सावानाचा मूळ प्रांत आहे. सावानाला त्यासाठी शासनाकडूनही काही अनुदान मिळते. परंतु सावाना तर्फे देखील या कार्यक्रमाचे आयोजन सफल करण्यासाठी कुठलेही प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी सावानाची पदाधिकारी निवडणूक ही जिल्हाभर गाजली होती. एखाद्या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जशी चर्चेत असते तशी सावानाची निवडणूक मोठ्या गाजावाजात पार पडली होती. परंतु ही निवडणूक जिंकण्यासाठी जे परिश्रम घेतले गेले ते परिश्रम या ग्रंथोत्सवाचे सफल आयोजन करण्यासाठी घेतले गेले नाहीत. निवडणुका लढणे हा जरी संविधानिक अधिकार असला तरी निवडून आल्यानंतर आपल्या संस्थेच्या मुळ उद्देशांना कुठेतरी हातभार लावून तो सफल केला पाहिजे याची जाणीव इथे कुणाला दिसून आलीच नाही. पदाधिका-यांपैकी किती पदाधिकारी या कार्यक्रमाला आले ?, जे आले ते किती वेळ थांबले? आणि जे थांबले त्यांनी वाचनसंस्कृती वाढावी म्हणून काय प्रयत्न केले? हे प्रश्न ओघाने येण्यासारखे निश्चीतच आहेत.
अनेक आयोजकांपैकी एक अशी जबाबदारी स्विकारल्यानंत खरे तर, हे कार्यक्रमाचे आयोजन सफल करून दाखविण्याची सावानाला एक खूप मोठी संधी मिळाली होती. परंतु सावानाने ती दवडली. परशुराम सायखेडकर नाट्यगृह आणि औरंगाबादकर सभागृह हे दोन सभागृह सावानाच्या अधिकारकक्षात येतात. एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी औरंगाबादकर सभागृह हा तुलनेने छोटा असलेला सभागृह या कार्यक्रमासाठी का निवडण्यात आला ? हे देखील अनाकलनीय आहे. इथे ज्या मोकळ्या जागेत पार्किंग केली जाते त्या जागेत ५ ते ६ निवडक प्रकाशकांनी दाटीवाटीने स्टॉल्स लावले आणि मग पार्किंग सुविधा नसल्यामुळे प्रेक्षकांनीही पाठ फिरवली. परशुराम सायखेडकर नाट्यगृहात या कार्यक्रमाचे आयोजन झाले असते तर निश्चीतपणेआणखी थोडे प्रेक्षक या कार्यक्रमाला आले असते.
पुस्तक वाचनाकडे लोक अनास्थेने पाहतात असे आपणच म्हणतो. आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे लोकांमध्ये पुस्तकाविषयी अनास्था आहे हे माहिती असताना देखील या कार्यक्रमाचे आयोजन सुटी सोडून “वर्किंग डे” ला करण्यात आले होते. त्यामुळे “आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास” या उक्तीप्रमाणे सहाजिकपणे हा कार्यक्रम वर्किंग डे ला असल्यामुळे त्याला प्रेक्षक लाभू शकले नाहीत. कार्यक्रम शासकीय असला म्हणून तो सुट्टीच्या दिवशी घेऊ नये, असा कुठलाही नियम नाही. परंतु तरीही ज्या सर्वसामान्य जनतेसाठी हा कार्यक्रम होता त्यांना गैरसोयीचे असलेले दिवस या सगळ्याच एकापेक्षा एक सरस आयोजकांनी आयोजनासाठी का निवडले ? याचाही आत्मशोध या सगळ्या आयोजकांनी घेणे गरजेचे आहे.
.