अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन वेगळ्या पक्षांचे नेते एकमेकांपुढे आले की त्यांच्या भेटीची कायमच चर्चा होत असते. पण हेच निवडणुकीच्या काळात घडले तर त्याचे अर्थ काढले जातात. शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे यांचे एकमेकांपुढे येणे ही सध्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेची बाब ठरत आहे.
अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांची एका खासगी कार्यक्रमादरम्यान भेट झाली. या भेटीत त्यांच्यात चर्चा, गप्पा किंवा विचारपूस वगैरे काहीच झाले नाही. पण जे काही झाले, त्याचेही वेगवेगळे अर्थ काढायला सुरुवात झाली आहे. शिर्डी येथे एका विवाह सोहळ्याला दोघेही उपस्थित होते. त्यावेळी दोघे एकमेकांपुढे आले. त्यात शुभांगी पाटील यांनी दोन्ही हात जोडले आणि तांबेंना नमस्कार केला. आता या नमस्काराचे निवडणुकीच्या काळात काहीही अर्थ काढता येतात. पण शुभांगी पाटील यांना विचारले असता त्यांनी अत्यंत सहज नमस्कार होता, असे सांगितले. मोठ्या माणसांना आपण आदर देतो आणि हा नमस्कार आदर व्यक्त करण्याचेच माध्यम होते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आपण अत्यंत सामान्य आहोत आणि आपल्यापुढे असलेली प्रत्येक व्यक्ती मोठी आहे, याच भावनेतून मी जगत असते, असेही त्या म्हणाल्या.
थोरात कुटुंबाची भेट घेणार
काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात यांच्या घरी घडलेल्या प्रकाराबद्दल त्या म्हणाल्या की, ‘त्यांच्या घरी मी जाणार आहे. आमचं बोलणं झालं होतं म्हणून भेट घ्यायला गेले होते. पण भेट होऊ शकली नाही. फोनवर बोलणे झाले. लवकरच त्यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहे.’
प्रचार उत्तम सुरू आहे
महाविकास आघाडी माझ्यासोबत आहे. शिवसेनेचे पदाधिकारी नाशिकमध्ये निवडणुकीच्या कामासाठी दाखल झाले आहेत. ते प्रचारात नसले तरीही माझी मदत करत आहेत. मी कुठल्याही पदावर नसताना लोकांची कामं केली, त्यामुळे पदावर असताना नक्कीच लोकांसोबत उभी राहणार असा त्यांना विश्वास आहे. माझ्या प्रचारासाठी सारेच लोक मेहनत घेत आहे, असे त्यांनी सांगितले.
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील समोरासमोर#newasa #nashik pic.twitter.com/lJo5mq9nra
— News18Lokmat (@News18lokmat) January 22, 2023
Nashik Graduate Election Shubhangi Patil Satyajit Tambe Politics