नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेरच्या दिवसापर्यंत ट्विस्ट बघायला मिळतील, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. ही निवडणूक दररोज नवे वळण घेत आहे. आता शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील यांनी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या प्रमुख पक्षांपैकी एकाचाही अधिकृत उमेदवार रिंगणात नाही. तरीही चारही पक्ष निवडणुकीत सक्रीय आहेत. हीच तर राजकारणाची गंमत आहे. एकतर भाजपची भूमिका पूर्णपणे संशयास्पद आहे. त्यात भर म्हणून भाजपने तिकीट नाकारलेल्या शुभांगी पाटील यांना समर्थन देण्याचे संकेत शिवसेनेने दिले आहेत. पण नाशिकच्या निवडणुकीचे चित्र पालटले ते डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेसला घरचा आहेर देऊन. त्यांनी मुलाला म्हणजे सत्यजित तांबे यांना अपक्ष उभे केले आहे. आज शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर केला. त्यासाठी डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. कपिल पाटील यांची भूमिका सत्यजित तांबे यांच्या किती उपयोगी पडते, हे ३० जानेवारीला मतदानाचा कौल बघितल्यावरच कळणार आहे.
पक्षाचा पाठिंबा नव्हता – डॉ. सुधीर तांबे
मी पहिल्यांदा नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढलो तेव्हा मला पक्षाचा पाठिंबा नव्हता. मी अपक्ष लढलो. तेव्हा कपिल पाटील आणि सर्व शिक्षक वर्गाने मला साथ दिली. त्यांचे मी आभार मानतो. कपिल पाटील आणि आम्ही एकत्र मिळून विधान परिषदेत शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला. पोटतिडकीने विषय मांडले, असे डॉ. सुधीर तांबे म्हणाले.
राजकारणावर योग्यवेळी बोलणार – सत्यजित तांबे
काँग्रेसमध्ये गेली २२ वर्षे काम करतोय. विद्यार्थी संघटना, जिल्हा परिषद, युवक काँग्रेस अश्या विविध संघटनांच्या माध्यमातून पक्ष संघटनेचं काम केलं. युवक काँग्रेसचा राज्याचा अध्यक्षही होतो. कपिल पाटील तर माझ्यासाठी विधानसभेचा मतदारसंघ शोधत होते. पण राजकारणात काही खरं नाही. गेले चार दिवस तुम्ही बघतच आहात. त्यावर योग्यवेळी बोलणार आहे, अशी प्रतिक्रिया सत्यजित तांबे यांनी दिली.
Nashik Graduate Election New Twist Satyajeet Tambe Politics