नाशिक – नाशिककरांसाठी मोठी खुषखबर आहे. ओझर विमानतळावरुन सध्या चार शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. त्यात आता जानेवारीमध्ये एका शहराच्या विमानसेवेची भर पडणार आहे. स्पाईसजेट या आघाडीच्या कंपनीद्वारे येत्या जानेवारीपासून नाशिक ते गोवा ही सेवा दिली जाणार आहे. तशी माहिती कंपनीने हवाई वाहतूक मंत्रालयाला दिली आहे.
केंद्र सरकारच्या उडान या योजनेअंतर्गत नाशिक विमानतळावरुन विमानसेवा सुरू झाली आहे. सद्यस्थितीत स्टार एअर कंपनीची नाशिक-बेळगाव, अलायन्स एअरची नाशिक-अहमदाबाद-दिल्ली आणि नाशिक-पुणे, ट्रुजेट कंपनीची नाशिक-अहमदाबाद या सेवा सुरू आहेत. विमानसेवेला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. आता आणखी एका सेवेची भर पडत आहे. उडान योजनेअंतर्गत स्पाईसजेट कंपनी ही नाशिक ते गोवा ही सेवा सुरू करणार आहे. यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांना पत्र दिले होते. त्याची दखल घेत सिंधीया यांनी उडान योजनेत मार्ग मंजूर झालेल्या कंपन्यांना विचारणा केली होती. त्यात स्पाईसजेटने गोवा सेवेची हमी दिली आहे. त्यामुळे सिंधीया यांनी भुजबळ यांना पत्र दिले असून त्यात या सेवेची माहिती दिली आहे. त्यामुळे आता नाशिककरांना अवघ्या दीड ते दोन तासातच गोवा गाठता येणार आहे. या सेवेचा नाशिकला मोठा फायदा होईल शिवाय पर्यटनही वाढेल, असे उद्योजक मनिष रावल यांनी सांगितले आहे. रावल यांनी विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात सातत्याने प्रयत्न केले आहेत.