नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील गंजमाळ परिसरातील इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या मास्टर मॉलला सायंकाळी आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रविवारची साप्ताहिक सुटी असल्याने मॉल बंद होता. मात्र, आगीची भीषणता मोठी होती. त्यामुळेच महापालिका अग्निशमन विभागाला तब्बल ३ तासांनी आगीवर नियंत्रण मिळवता आले.
सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मास्टर मॉलला आग लागल्याची घटना निदर्शनास आली. मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून धुराचे लोट येताना दिसले. परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निशमन व पोलिस यंत्रणेला माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे बंब तसेच भद्रकाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाने ४ बंब आणि २० जवानांच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अखेर ३ तासांनी त्यात यश आले. मोठ्या प्रमाणात असलेला धूर आणि मॉलच्या आवारात बंब जाण्यासाठी आलेल्या अडचणी यामुळे आग नियंत्रण मिळविण्यात उशीर झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, आग कशामुळे लागली हे अद्याप समजलेले नाही. मात्र, शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर, लाखोंच्या वस्तू जळून खाक झाल्याचे मॉलचे संचालक शाम आणी राजू मोटवानी यांनी सांगितले आहे.
nashik ganjmal master mall fire burn









