नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अन्न व औषध प्रशासनामार्फत विनापरवाना व लूज खाद्यतेल विक्रेत्यावर धाड टाकत ५७ हजार ५४० रुपयाचे ५४८ किलो खाद्यतेल जप्त केले. गेल्या काही दिवसात अन्न व औषध प्रशासनामार्फत कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर धाडसत्र सुरू आहे. या मोहिमेतच कळवण येथील मे प्रसाद प्रोव्हिजन येथे अन्नसुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी भेट दिली असता त्या ठिकाणी अन्न व्यवसाय करण्यासाठी आवश्यक अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत परवाना नसल्याचे आढळून आले.
त्याचप्रमाणे या ठिकाणी खुल्या स्वरूपात एक टन क्षमतेच्या टाकीतून नळाद्वारे खुल्या खाद्य तेलाची विक्री करीत असल्याचे आढळून आले. देशमुख यांनी अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत नमुना घेऊन सदरचे खाद्यतेल ५४८ किलो किंमत रुपये ५७ हजार ५४० इतका साठा जप्त केला. त्यानंतर तो विक्रेत्याच्या ताब्यात ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणात विनापरवाना व्यवसाय करीत असल्याने व्यवसाय बंद बाबत विक्रेत्यास नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे. यावेळी प्रशासनातर्फे खाद्यतेल विक्रेत्यांना आवाहन करण्यात आले आहे, कोणीही खुल्या स्वरूपात खाद्यतेलाची फेर विक्रीसाठी विक्री करू कसे आढळल्यास प्रशासनामार्फत कारवाई घेण्यात येईल. सदरची कारवाई सह आयुक्त नाशिक विभाग संजय नारगुडे व विवेक पाटील सहाय्यक आयुक्त अन्न यांचे मार्गदर्शनाखाली योगेश देशमुख यांनी केली.
Nashik FDA Action Kalwan Shop Edible Oil