नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगिक विकासासोबतच नाशिकला इलेक्ट्रॉनिक क्लस्टर येत्या काळात साकार होणार आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री दादाजी भुसे यांनी उद्योजकांसोबत बैठक घेऊन इलेक्ट्रॉनिक क्लस्टरसाठी जागा निश्चित करावी, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
आज आयटीआय सातपूर येथील मैदानात आयोजित निमा पॉवर 2023 प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार सीमा हिरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, एमआयडीसीच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे, निमा चे अध्यक्ष धनंजय बेळे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र सहसंचालक प्रफुल्ल वाकडे निमा चेअरमन तथा प्रदर्शन अध्यक्ष मिलिंद राजपूत, निमाचे मानद सचिव राजेंद्र अहिरे यांच्यासह उद्योजक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
उद्योगमंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले, इलेक्ट्रॉनिक क्लस्टर मंजुरीसोबतच दिंडोरी, घोटी याठिकाणी सुद्धा एमआयडीसीचे विस्तारीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी स्थानिक उद्योजकांचा सहभाग खूप महत्त्वाचा असून इलेक्ट्रॉनिक क्लस्टरमुळे जिल्ह्यात रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री उद्योग रोजगार निर्मिती योजनेतून मागील सहा महिन्यात 12 हजार 360 उद्योजक तयार झाले असून या वर्षभरात 25 हजार उद्योजक निर्मितीचे उद्दिष्ट आहे. इलेक्ट्रॉनिक क्लस्टर निर्मितीमुळे बाहेरील उद्योगही निश्चित नाशकात येतील यात शंका नाही, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.
मंत्री उदय सामंत म्हणाले, नाशिकसाठी अनेक सकारात्मक निर्णय शासनस्तरावर घेण्यात येत आहेत. निमाच्या आयोजित चार दिवसीय प्रदर्शनाला देशाबाहेरील कंपन्यांचे प्रतिनिधी भेट देणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील उद्योजकतेचा विकास होण्यास मदत होणार आहे. शहरात येणाऱ्या उद्योगामुळे विकासासोबतच पर्यावरणाची हानी होणार नाही, याची दक्षता उद्योजकांनी घेतली पाहिजे. एमआयडीसी परिसरातील ग्रामस्थ व नागरिकांचे प्रश्न विश्वासात घेऊन जनजागृतीद्वारे सोडविण्यात निमाच्या पदाधिकाऱ्यांनी अग्रेसर राहावे. तसेच माथाडी कामगारांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी देखील उद्योजकांनी घेतली पाहिजे. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर यानंतर औद्योगिक विकास करायचा असेल तर आता नाशिकशिवाय पर्याय नाही, असेही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री दादाजी भुसे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, निमा पॉवर 2023 या चार दिवसीय प्रदर्शनात उभारलेल्या विविध स्टॉल्सच्या माध्यमातून इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील उद्योजकांना मार्गदर्शन व ज्ञान मिळणार आहे. निमा संस्था ही गेल्या 53 वर्षापासून रोजगार निर्मिती, उद्योजक तयार करण्याचे काम अविरत करत असल्याची बाब प्रशंसनीय आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर अधोरेखित होणार आहे. नाशिकच्या विकासात महिंद्रा ॲन्ड महिंद्रा समूहाचा मोठा वाटा आहे. दिंडोरी, सिन्नर परिसरात उद्योगांसाठी जागा उपलब्ध झाल्यास निश्चितच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीसाठी संधी उपलब्ध होणार आहे.
नाशिकच्या विकासात एक मानबिंदू म्हणून आरोग्य विद्यापीठाच्या अंतर्गत साधारणत: 400 खाटांचे रुग्णालय व 100 विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन लवकरच होणार आहे. यासोबत विद्यार्थिनीसाठी एनडीए प्रवेशासाठी सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिकमध्ये सुरू होत आहे, ही नाशिकसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले. देशपातळीवर पाच शहरांमध्ये क्वालिटी सिटी म्हणून नाशिक शहराची निवड झाली असून त्यास निमा व उद्योजक यांचा हातभार
महत्त्वाचा आहे. चार दिवसीय प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते फित कापून निमा पॉवर 2023 प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रदर्शनाचे प्लॅटिनम स्पॉन्सर एमआयडीसी, गोल्डन स्पॉन्सर टीडीके, ई स्मार्ट, सिल्वर स्पॉन्सर थायसानक्रुप व एचएएलच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रदर्शनाचे अध्यक्ष मिलिंद राजपूत यांनी मनोगत निमाच्या कार्यप्रणाली विषयी माहिती दिली. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केले.
Nashik Electronic cluster Industry Development