नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूर धरणात १४ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. साहिबाज नेहमतअली खान (रा. मराठानगर, विहीतगाव) असे मृत मुलाचे नाव आहे. धरणाच्या बॅक वॉटर भागात मित्रांसमवेत फिरण्यासाठी तो गेला होता. त्यावेळेस ही घटना घडली. या घटनेत अन्य एकास वाचविण्यात यश आले आहे. याप्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिबाज खान व त्याचे चार मित्र शनिवारी दुपारी ईद निमित्त सुट्टी असल्याने गंगापूर धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. त्यातील दोघे पाण्यात उतरले. साहिबाज याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. साहिबाज बुडत असल्याचे लक्षात येताच दुस-या मित्राने त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही पाण्यात बुडाला.
दोघे बुडत असतांना मित्रांनी आरडाओरड केल्यामुळे मुलांचा आवाज ऐकून परिसरातील नागरीक धावून आले. त्यांनी दोघांना बाहेर काढले. पण, साहिबाज याचा मृत्यू झाला होता. या घटनेत दुसरा मित्र मात्र वाचला. या घटनेची माहिती मिळताच तालूका पोलिसांनी घटनास्थळी आले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविला आहे.
Nashik Eid Celebration Youth Drown Gangapur Dam