नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोविडमुळे नाशिकहून राजस्थानला शिक्षणासाठी गेलेली दुर्गेश नंदिनी अभिमन्यू राठोड यंदाच्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथवर पाहुण्यांसमोर सॅक्सॉफोन या बँड पथकातील वाद्याद्वारे वाजवल्या जाणाऱ्या मधुरधुनीची साक्षीदार असणार आहे.
इंदिरानगर मध्ये राहणाऱ्या अभिमन्यू सिंह राठोड यांची कन्या दुर्गेश नंदिनी ही नवव्या इयत्तेत राजस्थानमधील बिट्स पिलानी अर्थात
बिर्ला बालिका विद्यापीठ या शाळेत चालू शैक्षणिक वर्षापासून शिक्षण घेत आहे. या शाळेच्या एनसीसी मधील कॅडेटसला दरवर्षी प्रजासत्ताक दिनी परेड मध्ये सहभागी होऊन बँड वाजवण्याची संधी मिळते.
पं. जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधानपदी असताना या शाळेला भेट दिली असता, त्यांनी विद्यार्थिनींची मेहनत लक्षात घेऊन या परेड सोहळ्यात ‘सारे जहाँ से अच्छा’ ही धुन वाजवण्यासाठी कायमस्वरूपी निमंत्रित केले आहे. दरवर्षी या शाळेच्या विद्यार्थिनी 26 जानेवारी च्या बँड पथकात सहभागी होतात. त्यासाठी त्यांना अभ्यास सांभाळून दिल्लीमध्ये एक महिन्याचा खडतर सराव करावा लागतो.
कोविड -19 मुळे गेली दोन वर्ष मुलींचे एनसीसी बँड पथक परेडमध्ये सहभागी होऊ शकले नव्हते. एनसीसीच्या 51 कॅडेट – विद्यार्थिनी यंदा या बँड पथकात असतील. इंदिरानगर व्हिस्टा अपार्टमेंट मध्ये दुर्गेशनंदिनीच्या पालकांचे वास्तव्य आहे. ती मागील वर्षी पर्यंत फ्रावशी शाळेची विद्यार्थिनी होती. या बँड पथकाचा दिल्लीत कडाक्याच्या थंडीत सकाळी पाच वाजता सराव होत आहे. नुकतेच लष्कर प्रमुख मनोज पांडे यांनी या पथकाच्या सरावाचे निरीक्षण केले.
Nashik Durgesh Nandini 26 Jan Parade Saxophone
Performance Student Girl