नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २००५ साली वर्धा जिल्ह्यातील डोरली येथील गावकऱ्यांनी शेतीतून उत्पन्न मिळत नाही म्हणून ‘गाव विकणे आहे’ अशी पाटी गावाबाहेर लावली आणि अनोखे आंदोलन केले होते. संपूर्ण देशात या आंदोलनाची चर्चा झाली होती. त्यानंतर एवढ्या वर्षांतही महाराष्ट्रातील परिस्थिती बदललेली दिसत नाही. कारण आता नाशिक जिल्ह्यातील फुलेमाळवाडी येथील गावकऱ्यांनीही हेच पाऊल उचलले आहे.
देवळा तालुक्यातील हे गाव आहे. जवळपास ५३४ हेक्टर क्षेत्र असून अख्खे गाव शेती व्यवसायावर जगते. पण शेतमालाला भावच मिळत नसल्याने मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि साध्यासाध्या गरजा पूर्ण करणेही कठीण झाले आहे. या गावातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांदा, गहू, हरभरा, भाजीपाला आणि आणखी काही नगदी पिकं येथील शेतकरी घेतात. पण कुठल्याच पिकाला योग्य भाव मिळत नाही.
सरकार शेतकऱ्यांपेक्षा ग्राहक हिताला जास्त महत्त्व देतात. त्यामुळे टोकाचा निर्णय घेण्याची वेळ गावावर आली. गाव विकले तर त्यातून येणाऱ्या पैशातून पुढचं आयुष्य काढता येईल, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे गाव विकण्याचा निर्णय संपूर्ण गावकऱ्यांनी एकत्र येऊन घेतला आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयाच्या ठरावाची प्रत सरकारकडेही पाठविण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक अधिकारी, जिल्हा प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी चांगलेच गोंधळात पडले आहेत. प्रवीण बागूल, अमोल बागूल, राकेश सोनवणे, अविनाश बागूल आणि अक्षय शेवाळे या शेतकऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
स्थलांतर कारणीभूत
फुलेमाळवाडीतील गावकऱ्यांनी परिस्थितीला कंटाळून कर्नाटक आणि गुजरात राज्यामध्ये स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भातही गावकऱ्यांनी एकत्र येऊन ठराव केला होता आणि सरकारकडे ठरावाची प्रत पाठवली होती.
लोकप्रतिनिधींची अडचण
फुलेमाळवाडीतील लोकांनी घेतलेल्या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची चांगलीच अडचण झाली आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असताना गावाला असा निर्णय घ्यावा लागणे हे दुर्दैवी मानले जात आहे. त्यामुळे आता गावकऱ्यांची समजूत घालावी की सरकारला स्पष्टीकरण द्यावे, अशा गोंधळात ते पडले आहेत.
Nashik District Villagers Decision Sale Village