नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सप्टेंबर व ऑक्टोबर 2022 या कालावधीत अवकाळी पावसाने ज्या शेतकऱ्यांचे शेतपिकांचे नुकसान झाले आहे, त्यांना ऑनलाईन पद्धतीने मदत देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. त्यानुसार काही शेतकऱ्यांचे राष्ट्रीयकृत बँक खाते हे आधार लिंक नसल्याने त्यांच्या खात्यावर मदतीचा निधी जमा होत नाही. त्यामुळे सबंधित शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार सोबत लिंक करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व गट विकास अधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी यावेळी संबधित अधिकाऱ्यांना सूचना देतांना सांगितले की, 7 एप्रिल ते 16 एप्रिल 2023 या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे तातडीने पूर्ण करून त्याबाबतचे अ, ब, क, ड प्रपत्र 20 एप्रिल 2023 पर्यंत सादर करावेत.
अवकाळी पाऊस व गारपीटमुळे एप्रिल 2023 मध्ये नुकसान झालेल्या ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँक खात्याशी आधार लिंक केले नाही त्यांनी ते आधार लिंक करून घेण्यात यावी. त्याबाबत ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक यांच्याकडे पंचनामे करतेवेळी माहिती द्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.
Nashik District Unseasonal Rainfall Crop Loss Farmers Compulsion