नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाची प्रतिक्षा असल्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये फारसा समाधानकारक जलसाठा नाही. मात्र, थोडीशी दिलासादायक बाब म्हणजे, भावली, हरणबारी नंतर आता पुणेगाव धरण ओव्हरफ्लो झाले आहे. दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत असल्याने धरण पूर्ण क्षमतेन भरले आहे. या धरणाचे दोन दरवाज्यांमधून पाण्याचा विसर्ग ओझरखेड धरणात करण्यात आला आहे. दिंडोरी तालुक्यातील सहा धरणांपैकी फक्त पुणेगाव धरण प्रथम पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतक-यांमध्ये समाधान आहे.
जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये ३१ जुलै अखेर ५३ टक्के साठा होता. गंगापूर धरणाचा साठा ७७ टक्के तर समुहात ६२ टक्के साठा आहे. आता त्यात वाढ झालेली आहे. ३० जून अखेर जिल्ह्यातील धरणात २१ टक्के साठा होता तर गंगापूर धरणाचा साठा २९ टक्के तर समुहात २० टक्के साठा होता. पण, ३१ दिवसांमध्ये २४ प्रकल्पांमध्ये ३२ टक्के वाढ झाली आहे.
भावली, हरणबारी, पुणेगाव धरण ओव्हरप्लो झाले आहे. त्याचबरोबरच गंगापूर, दारणा, कडवा, या धरणात ७५ टक्केहून अधिक पाणीसाठा झाला आहे. पालखेड, मुकणे, नांदूरमदमेश्वर, चणाकपूर, पुनद या धरणात ५० टक्केहून अधिक साठा आहे. तर १५ धरणात मात्र ५० टक्केपेक्षा कमी साठा आहे. गेल्या पावसाळयात जिल्हयातील जवळपास सर्व धरण भरली होती. त्यानंतर हा धरणसाठा कमी झाला. पण, आता वाढ होत आहे. अजूनही काही ठिकाणी दमदार पाऊस नाही. त्यामुळे य़ेथील धरणाची पातळी कमी आहे. पुढील काळात ही धरणे भरण्याची शक्यता आहे.
Nashik District Third Dam Overflow
Dindori Punegaon Water Storage Rainfall