दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वणी – पिंपळगाव रस्त्यावरील बोराळे फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत तिसगाव (ता. दिंडोरी) येथील एकाच कुटुंबातील काका व दोन पुतणे असे तिघे मयत झाले. घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तीन कर्ते पुरुष मयत झाल्याने कराटे कुटुंबासह तीसगाव गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत वणी पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वणी ते पिंपळगाव बसवंत रस्त्यावरील बोराळे फाटा येथे हा अपघात झाला. वणीकडून पिंपळगाव बसवंत कडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने तिसगावकडून वणीकडे येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील निवृत्ती सखाराम कराटे (वय ५५), केदु यशवंत कराटे (वय ३५) व संतोष विष्णू कराटे (वय ३३) सर्व रा. तिसगाव ता. दिंडोरी हे मृत्युमुखी पडले. तिघे जण वणी येथे आठवडे बाजारासाठी येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.
अपघाताचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना वणी रुग्णालायात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासुन मृत घोषीत केले. रात्री उशीरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला असुन पलायन करणाऱ्या अज्ञात वाहनाचा पोलीस शोध घेत आहे. याबाबत अधिक तपास वणी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. स्वप्नील राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस करीत आहे.
Nashik District Road Accident 3 Death Dindori