देवळा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतीच्या रस्त्यावरून सख्ख्या भावाकडून भाऊ,भावजय व पुतणीला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना देवळा-मालेगाव रस्त्यावरील लोखंडे पॅलेस येथे दुपारच्या सुमारास घडली. तिघेही जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नाशिक येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, देवळा-मालेगाव रस्त्यावरील लोखंडे पॅलेस येथील माजी सैनिक मांगु लोखंडे आणि त्यांचा सख्खा भाऊ संजय लोखंडे यांच्यामध्ये शेत रस्त्यावरून वाद झाल्याने संजय लोखंडे आणि त्यांच्या कुटुंबाने मांगु रतन लोखंडे व त्याची पत्नी कल्पना तसेच मुलगी माधुरी लोखंडे यांना जबर मारहाण केली.
देवळा पोलिसांत संजय लोखंडे त्यांची पत्नी मनीषा लोखंडे,मुलगा सागर व प्रेम लोखंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. याबाबत पुढील तपास देवळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ,पोलीस नाईक ज्योती गोसावी,सहायक पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे पोलीस हवालदार चंद्रकांत निकम करत आहेत.
गंभीर जखमी मांगु लोखंडे हे देवळा तालुक्यातील आजी-माजी सैनिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहेत . त्यांच्यासह पत्नी तसेच मुलीवर त्यांच्या सख्ख्या भाऊ व भावाचे मुलं व भावाची पत्नी यांनी सर्वांनी मिळून तीक्ष्ण धारदार हत्यारांनी अतिशय जीवघेणा प्राणघातक हल्ला झाल्याचा घटनेचा आजी माजी सैनिक संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला असून , आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी व आरोपीना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी माजी सैनिक संघटनेचे जनसंपर्क अध्यक्ष प्रविण बोरसे यांनी केली आहे.
Nashik Deola Crime Brother Attack on Family Members