नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेव) – नव्या पिढीतील कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी ‘सूर विश्वास’ या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. 22 जानेवारी 2023 रोजी सकाळी 7:00 वाजता अथर्व वारे (तबला), प्रतिक पंडित (सतार), समृद्ध कुटे (बासरी) यांच्या जुगलबंदीने सुर विश्वासची मैफल रंगणार आहे. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे या करणार आहेत.
मैफिलीचे हे 22सवे पुष्प असून विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओच्या समन्वयक ऋचिता ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून संकल्पना विनायक रानडे यांची आहे. डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास गार्डन शेजारी) ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. उदयोन्मुख कलावंताच्या प्रयोगशीलेचा अविष्कार रसिकांना दर महिन्याला अनुभवण्यास मिळत आहे.
अथर्व वारे (तबला)
वयाच्या पाचव्या वर्षापासून तबल्याचे शिक्षण वडील नितीन वारे यांचेकडे घेतले. त्यानंतर पं. नयन घोष (मुंबई) यांचेकडे शिक्षण सुरू आहे. तबल्यात एम.ए. पदवी प्राप्त केली आहे. तसेच गांधर्व महाविद्यालयाची विशारद आणि अलंकार पदवी प्राप्त केली आहे. भारत सरकारची मानाची सीसीआरटी स्कॉलरशीप मिळाली असून आकाशवाणीचा मान्याताप्राप्त कलाकार आहे. नांदेड येथे झालेल्या राष्ट्रीय वादन स्पर्धेमध्ये सुवर्णपदक तसेच मुंबई येथे झालेल्या बंदीश तबला वादन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे. उस्ताद अमीर हुसेनखाँ पुरस्कार व पं. नारायणकाका जोशी पुरस्कार प्राप्त झाला आहे. अथर्व भारतभर तबला वादनाची साथसंगत करत असतो.
प्रतीक पंडित (सतार) –
संगीत शिक्षणाची सुरूवात पं. सुभाष दसककर यांच्याकडे झाली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय किर्तीचे सतार वादक पद्मश्री उस्ताद शाहिद परवेझ खान व त्यांचे चिरंजीव शाकीर खान यांच्याकडे गेली 7 वर्षापासुन गुरूकूल पद्धतीने शिक्षण घेत आहे. संवादिनी वादनासाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
समृद्ध कुटे (बासरी) –
वयाच्या 5 व्या वर्षापासुन वडिल सुप्रसिद्ध बासरी वादक अनिल कुटे यांच्याकडे बासरी वादनाचे औपचारीक शिक्षण घेण्यास सुरूवात केली. चिन्मय नादबिंदु यांच्या अंतर्गत पं. हिमांशु नंदा यांच्याकडे त्याने काही वर्ष शिक्षण घेतले. सध्या पद्मविभुषण पं. हरिप्रसाद चौरसिया वृंदावन, गुरूकुल भुवनेश्वर, ओडिशा येथे पारंपारिक गुरू शिष्य परंपरेमध्ये त्याने शिक्षण सुरू आहे. प्रतिष्ठेची सी.सी.आर.टी. शिष्यवृत्ती त्याला वयाच्या 14 व्या वर्षी प्राप्त झाली आहे.
सदर कार्यक्रम विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा जलालपूर, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास टर्फ, ग्रंथ तुमच्या दारी, ऑडियो पार्टनर दि ऑर्क ऑडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ठाकूर, ऋचिता ठाकूर व विनायक रानडे यांनी केले आहे.
Nashik Cultural Program Jugalbandi of 3 Kalakar