नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक व नाशिक महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्याच्या एक आठवडा आधीपासून संस्कृती जपणारे विविध सामुहिक कार्यक्रमांना आज संध्याकाळपासून सुरवात होत आहे, आज पहिल्या दिवशी संध्याकाळी ६ वाजता “हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत असून” या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील सर्व ढोल पथकांचे एकत्रित ‘महावादन’ (१००० ढोलांचे समूह वादन) छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी ‘पाडवा पटांगणावर’ गुढीपाडव्याच्या एक आठवडा आधीपासून संस्कृती जपणारे विविध सामुहिक कार्यक्रम घेण्यात येतात. कार्यक्रमाचे उददेश हे आपल्या भारतीय संस्कृतीचे संवर्धन, जतन आणि दर्शन हा असतो. कार्यक्रमाचे विषय हे नेहमीच राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, शिक्षण सेवा, महिला सबलीकरण, गोसेवा, सामाजिक एकता जनजाती पुनरुत्थान इत्यादी राहिलेले आहेत. यंदाच्या वर्षी “पर्यावरण रक्षण (पंचमहाभूते)” हा विषय घेऊन राष्ट्रीय विकास मंडळ संचलित, नववर्ष स्वागत यात्रा समिती व नाशिक महानगरपालिकाही सज्ज झाली आहे.
त्या अनुषंगाने, फाल्गुन कृ. ११, शनिवार १८ मार्च २०२३ रोजी “हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत असून, या ३५० व्या हिंदू साम्राज्य स्थापना वर्षाच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील सर्व ढोल पथकांचे एकत्रित ‘महावादन’ (१००० ढोलांचे समूह वादन, सायंकाळी ६ वाजता), छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे. आज होणाऱ्या या महावादनात एकूण ३० पथके सहभागी होणार असून १००० ढोल व २०० ताशे असणार आहेत, कार्यक्रमात सुरवातीला सलग ४५ मिनिटे महावादन सादर होईल त्यानंतर गारद व सामुहिक शिवस्तुती सादर केली जाईल मग सामूहिक वंदे मातरम म्हणून कार्यक्रम संपन्न होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘नाशिक शहर पोलीस आयुक्त, अंकुश शिंदे व उपजिल्हाधिकारी, भूसंपादन नाशिकचे गणेश मिसाळ’ हे उपस्थित राहणार आहेत आहे.
नाशिक नगरीतील सर्व ढोल पथक एकत्र येऊन महावादन हा सामुहिक ढोल ताशा वादनाचा कार्यक्रम साकारत असतात. ढोलाच्या नादातून मोठ्या प्रमाणात सकारात्मक उर्जा तयार होत असते. त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत हे सकारात्मक उर्जेने व्हावे हा उददेश असतो. तरुण तरुणींमध्ये या कार्यक्रमाचे प्रचंड आकर्षण आहे व त्यांचा या महावादनात लक्षणीय सहभागही आहे. तरी आज होणाऱ्या या महावादन कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने नाशिककरांनी उपस्थित रहावे असे आवाहन नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक चे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, उपाध्यक्ष राजेश दरगोडे, सचिव योगेश गर्गे व संघटक जयंत गायधनी, महावादन प्रमुख मिलिंद उगले व रोहित गायधनी यांनी केले आहे.
https://twitter.com/Prasad_garbhe/status/1636998556773933057?s=20
Nashik Cultural 1 Thousand Nashik Dhol Mahavadan Today