नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात पोलिसांचा धाक राहिला नसल्याने गुंडगिरीला ऊत आल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात दररोज हत्येची घटना समोर येत आहे. त्याशिवाय मारहाण, विनयभंग, चोरी यासारख्या गुन्ह्यांनी हैदोस माजवला आहे. त्यामुळे नाशिक शहर हे असुरक्षित असल्याचे निदर्शनास येत आहे. आता एक धक्कादायक बाब उजेडात आली आहे. सर्वाधिक दाट वस्ती असलेल्या सिडकोत एका विद्यार्थ्याला टवाळखोरांनी भरदिवसा बेदम मारहाण केली आहे. त्यात हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे.
अंबड पोलिसांनीच दिलेल्या माहितीनुसार, अंकुश गणेश तांबारे (१७ रा. गिरीराज रो हाऊस बुरुकुले रो हॉलच्या मागे, उत्तमनगर) हा विद्यार्थी सिडकोतीलच वावरे कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. कॉलेज सुटल्यानंतर तो घरी जात होता. त्याचवेळी धक्का लागल्याचा बहाणा करीत ४ ते ५ टवाळखोरांनी या विद्यार्थ्याला भर रस्त्यात घेरले. त्यानंतर या टवाळखोरांनी धारदार शस्त्रांनी या विद्यार्थ्यावर वार केले. या हल्ल्यामध्ये हा विद्यार्थी जखमी झाला आहे. त्याच्या डोळ्यालाही दुखापत झाली आहे. तसेच, रक्तस्त्रावही झाला आहे. हा सर्व प्रकार बघून परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. नागरिकांना पाहून टवाळखोरांनी पळ काढला. जखमी विद्यार्थ्याला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, भरदिवसा आणि दाट लोकसंख्येच्या वस्तीत एवढा गंभीर प्रकार घडला असतानाही पोलिसांचे पथक घटनास्थळी वेळेत पोहचू शकले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Nashik Crime Youth Beaten Student in Cidco Area