नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- टेट परिक्षा देणे काही विद्यार्थ्यांसाठी नुकसानीचे ठरले आहे. एका परीक्षास्थळावर चोरट्यांनी धुमाकूळ घालत विद्यार्थ्यांच्या बॅगेतील रोकडसह मोबाईलवर डल्ला मारला. त्यात एका विद्यार्थ्याच्या चोरलेल्या डेबीट कार्डचा गैरवापर करून परस्पर रोकड लांबविण्यात आली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम अनिल पगार (रा.शिर्डी ता.राहता) या विद्यार्थ्याने याबाबत फिर्याद दिली आहे. डीएड – बीएड या शैक्षणीक प्रवेशासाठी लागणारी टेटची गुरूवारी (दि.२९) शहरातील वेगवेगळय़ा केंद्रावर परिक्षा पार पडली. शुभम पगार व अन्य विद्यार्थी हा पेपर देण्यासाठी सकाळी अकराच्या सुमारास म्हसरूळ परिसरातील पी.व्ही.जी कॉलेज येथे दाखल झाले होते. विद्यार्थ्यांना आपल्या वस्तू बाहेरच काढून ठेवण्याचे फर्मान सोडण्यात आल्याने बहुतांश विद्यार्थ्यांनी सोबत आणलेल्या दुचाकींच्या डिक्कीत वस्तू ठेवल्या होत्या. पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकींच्या डिक्की उघडून चोरट्यांनी विद्यार्थ्यांचे साहित्य चोरून नेले असून या घटनेत पगार यांच्या पाकिटातील साडे तीन हजाराची रोकड तसेच एटीएम कार्ड असा ऐवज भामट्यांनी लांबविला होता.
दरम्यान पगार यांच्या पाकिटातील डेबीट कार्डचा गैरवापर करून चोरट्यांनी त्यांच्या बॅक खात्यातील ५१ हजार ६५० रूपयांवर डल्ला मारला आहे. याबरोबरच विजय बागुल आणि प्रिया पात्रा या विद्यार्थ्यांच्या दुचाकीतील डिक्कीत ठेवलेली रोकड आणि मोबाईल असा सुमारे ९१ हजार ४५० रूपये किमतीचा ऐवज लांबविण्यात आला आहे.