नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वाहन बाजूला घेण्यास नकार दिल्याने त्रिकुटाने चालकावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना विद्याविकास सर्कल भागात घडली. या घटनेत चालक जखमी झाला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आसिफ रंजा मुस्ताक शेख (रा.जेएमसीटी कॉलेज वडाळारोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शेख बुधवारी (दि.२८) विद्याविकास सर्कल भागात गेले होते. हॉटेल नबाब कबाब जक्शन भागात रात्री साडे अकराच्या सुमारास ते आपल्या चारचाकी वाहनाजवळ उभे असतांना ही घटना घडली.
पाठीमागून आलेल्या तीन जणांनी त्यांना वाहन बाजूला घेण्यास सांगितले असता ही घटना घडली. शेख यांनी वाहन बाजूला घेण्यास नकार दिला असता तिघांपैकी एकाने आपल्या कमरेस लावलेला धारदार कोयता काढून शेख यांच्या डोक्यात वार केला. या घटनेत शेख गंभीर जखमी झाले असून टोळक्याने पोबारा केला आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक डगळे करीत आहेत.