नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शेजा-यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने एकास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना सन.२०२० मध्ये रेडक्रॉस भागात घडली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जगन धनजी रेवर (५८ रा. बिल्डींग नं. २ डॉ. आँबेडकर कॉलनी रेडक्रास) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत नरेश हिरालाल मकवाना (४१ रा.सदर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादी व आरोपी एकाच इमारतीतील रहिवासी असून ते एकमेकांचे शेजारी आहेत. रेवर १७ नोव्हेंबर २०२० रोजी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील जिन्यावर विनाकारण शिवीगाळ करीत होता. यावेळी मकवाना यांनी त्यास टोकले असता ही घटना घडली होती.
मकवाना यांनी समजवून सांगितल्याचा राग आल्याने त्याने घरातून लोखंडी कोयता काढून आणत पाय-या उतरणा-या मकवाना यांच्यावर हल्ला केला होता. या घटनेत मकवाना यांच्या कमरेजवळ वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक पी.एस.गायकवाड यांनी केला. हा खटला कोर्ट क्र. ७ चे जिल्हा व सत्र न्यायाधिश व्ही.एस.मलकलपट्टे – रेड्डी यांच्या कोर्टात चालला. सरकार तर्फे अॅड. सुलभा सांगळे यांनी काम पाहिले. असता न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत त्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.