नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शेवगा पावडर खरेदी विक्री व्यवसायात गुजरातच्या ठकबाजांनी शहरातील व्यावसायीकास लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. विश्वास संपादन करून घाऊक खरेदीचे आमिष दाखवत भामट्यांनी तब्बल ८७ लाख रूपयांना फसविले असून, अनेक महिने उलटूनही पैसे अदा न केल्याने व्यावसायीकाने पोलीसात धाव घेतली आहे. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज पटेल व अनिल पटेल (रा. भुज,गुजरात) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ठकबाजांची नावे आहेत. याबाबत हर्षल भानदास ठाकरे (रा.बलरामनगर,नाशिक) या व्यावसायीकाने फिर्याद दिली आहे. ठाकरे यांचा हरबक्स अॅग्रो प्रोडक्शन अॅण्ड एक्सपोर्ट नावाचा व्यवसाय आहे. गंगापूर नाका येथील सिध्दी पुजा रेसि. या इमारतीत त्यांचे कार्यालय असून या कार्यालयात येवून संशयितांनी एम. पटेल नामक कंपनीच्या नावे शेवगा पावडर खरेदी केली होती. दोन वेळा केलेल्या खरेदीत संशयितांनी रोखीने व्यवहार करून ठाकरे यांचा विश्वास संपादन केला. यानंतर शेवगा पावडर एक्सपोर्ट करायची असल्याचे सांगून भामट्यांनी घाऊक खरेदीचे आमिष दाखवून ही फसवणुक केली.
५ ऑगष्ट २०२४ रोजी पटेल बंधूनी नाशिक गाठत ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पाच लाख रूपयांचे टोकन देत ६ हजार ४४० किलो वजनाच्या व सुमारे ९२ लाख २ हजार ७६० रूपये किमतीच्या पावडरची ऑर्डर दिली. लवकरच उर्वरीत रक्कम अदा करण्याची ग्वाही देण्यात आल्याने ठाकरे यांनी गोडावून मधील माल ट्रान्सपोर्ट वाहनातून पोहच केला. मात्र आठ – नऊ महिने उलटूनही पैसे न मिळाल्याने त्यांनी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही. त्यामुळे ठाकरे यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहेत.