नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात मॅफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थाची राजरोसपणे विक्री होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकत एका एमडी प्लेडरच्या मुसक्या आवळल्या असून, ही कारवाई जेलरोड भागात करण्यात आली असून संशयिताच्या घरझडतीत २० हजार रूपये किमतीचा व चार ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन मिळून आला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिजीत दिपक सोनार (३१ रा. त्रिमुर्ती गोकूळनगर शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या एमडी प्लेडरचे नाव आहे. सोनार एमडी या अमली पदार्थाची राजरोसपणे विक्री करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.२३) ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सोनार यास हुडकून काढत त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात २० हजार रूपये किमतीचे मॅफेड्रॉन मिळून आले.
संशयितास मुद्देमालासह नाशिकरोड पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले असून याप्रकरणी अंमलदार भारत डंबाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.