नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा): शहरातील पीएमश्री केंद्रीय विद्यालय नाशिकरोड कॅम्प येथील दहावीचा विद्यार्थी आदित्य चौधरी याने ७ आणि ८ एप्रिल २०२५ रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या केव्हीएस राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात (आरएसबीव्हीपी) दुसरे स्थान पटकावले आहे. आदित्यने ‘अ रेव्होल्यूशनरी लीप टू फ्युचरिस्टिक फ्युएल-ऑक्सीहायड्रोजन’ नावाचे एक नाविन्यपूर्ण मॉडेल तयार केले आहे.
केंद्रीय विद्यालय संघटन आयुक्त निधी पांडे यांच्या हस्ते त्यास प्रमाणपत्र मिळाले. त्याच्या मार्गदर्शक शिक्षिका उज्ज्वला चांदोरकर यांनाही यावेळी प्रमाणपत्र देण्यात आले.
आदित्य आणि उज्ज्वला चांदोरकर यांचा प्रभारी प्राचार्य गजराज मीना यांनी शाळेत सत्कार केला. त्यांनी आदित्यच्या वैज्ञानिक नवोन्मेष आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांबद्दल कौतुक केले. याप्रसंगी आदित्यचे वडील विनोद चौधरी यांचेही अभिनंदन केले. नवोदित बाल शास्त्रज्ञ आदित्य यास भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ग्रंथपाल रोहीत गौड, अमीत कुमार शुक्ला, वीणा गौडर आदींसह सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.