नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पॉलीसी बंद करून पैसे काढून देण्याचा बहाणा करीत सायबर भामट्यांनी शहरातील एकाच्या बँक खात्यावर डल्ला मारला. या घटनेत गोपनिय माहितीच्या आधारे भामट्यांनी साडे पाच लाखाची रोकड परस्पर लांबविली असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील ५८ वर्षीय विमा धारकाने याबाबत फिर्याद दिली आहे. आर्थीक चणचण असल्याने विमाधारकाने ऑनलाईन पध्दतीने आपली पॉलीसी बंद करण्यासाठी प्रयत्न केले असता ही घटना घडली. गेल्या जानेवारी महिन्यात भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. वेगवेगळया मोबाईल नंबरवरून संपर्क साधणा-या भामट्यांनी तक्रारदार विमाधारकास पॉलिसी बंद करून भरलेले पैसे काढून देण्याची हमी देत ही फसवणुक केली.
विमाधारकाचा विश्वास संपादन करीत भामट्यांनी बँक खात्यासह अन्य गोपनिय माहिती मिळवित तक्रारदाराच्या बँक खात्यातील ५ लाख ४० हजार ११९ रूपयांची रक्कम परस्पर काढून घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक ढवळे करीत आहेत.