नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- इमारतीच्या गॅलरीतून उडी घेत ६८ वर्षीय वृध्देने आत्महत्या केली. ही घटना पेठरोडवरील शाहूनगर भागात घडली. वृध्देच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसले तरी दुर्धर आजारापणास कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पार्वताबाई पुंडलिक चारोसे (रा.राजमुद्रा स्पर्श अपा.सप्तरंग सोसा.मागे शाहूनगर) असे मृत वृध्देचे नाव आहे. चारोसे यांनी बुधवारी (दि.१२) सायंकाळच्या सुमारास घरात कुणी नसतांना अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घराच्या गॅलरीवरून उडी घेतली होती. बहूमजली इमारतीवरून पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. नातू रूतीक चारोसे यांने त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले.
दरम्यान चारोसे या दुर्धर आजाराने पीडित असल्याने त्यांनी नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात असून अधिक तपास उपनिरीक्षक योगेश परदेशी करीत आहेत.