नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नांदूरनाका भागात फ्रीजमध्ये उतरलेल्या करंटचा शॉक लागल्याने अल्पवयीन हॉटेल कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जगदिश कमल परियार (१५ मुळ रा.पिंपळगाव ब.ता.निफाड) असे मृत कामगाराचे नाव आहे. परियार नांदूरनाका भागातील हॉटेल बांबूज येथे कामास होता. बुधवारी (दि.२५) तो हॉटेलमधील किचनमध्ये काम करीत असतांना ही घटना घडली. फ्रीज मध्ये उतरलेल्या इलेक्ट्रीक करंटमुळे हा अपघात झाला.
इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने त्यास तातडीने नजीकच्या आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय सुत्रांनी मृत गोषीत केले. याबाबत डॉ.प्राजक्ता देवरे यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार अरूण जाधव करीत आहेत.
संतप्त टोळक्याकडून वृध्दास बेदम मारहाण
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– रस्त्यावरील हाणामारीत मध्यस्थी करणे एका वृध्दाच्या अंगलट आली आहे. संतप्त टोळक्याकडून वृध्दास बेदम मारहाण करण्यात आली असून हातातील कडे डोक्यात मारण्यात आल्याने वृध्द जखमी झाले आहेत. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू बाबुलाल कुमावत (६१ रा.अंबिका स्विटमागे,अशोकनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कुमावत बुधवारी (दि.२५) दुपारी श्रमिकनगर भागात गेले होते. गणेश कॉलनीतून ते पायी जात असतांना ही घटना घडली. वाटेत अज्ञात तीन ते चार तरूण एका तरूणास मारहाण करीत होते. त्यामुळे कुमावत यांनी धाव घेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. सदर युवकास नका मारू असे म्हटल्याने संतप्त टोळक्याने त्यांच्याकडे मोर्चा वळवित त्यांना बेदम मारहाण केली. यावेळी एकाने हातातील वजनी कडे डोक्यात मारल्याने कुमावत जखमी झाले असून अधिक तपास हवालदार केदारे करीत आहेत.