नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –हात उसनवार घेतलेल्या १ लाख ३० हजार रूपयांच्या मोबदल्यात पावणे नऊ लाख रूपये फेडूनही आठ लाख रूपये बाकी असल्याचा दावा करीत वसूलीसाठी खासगी सावकाराने हॉटेलमध्ये वेटरचे काम करणा-या एकास तगादा लावत कुटूंबियास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने शहरातील सावकारी पुन्हा एकदा चर्चेत आली असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनिल महाजन, ज्योत्स्ना महाजन, दिपक महाजन व त्यांचे चुलत सासरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित खासगी सावकारांची नावे आहेत. याबाबत दशरथ पंडीत साबळे (रा.सुबोध शिल्प अपा.रामनगर) यांनी फिर्याद दिली आहे. साबळे यांनी गेल्या ५ मार्च २०१६ रोजी संशयितांकडून १ लाख ३० हजाराची रक्कम हातउसनवार म्हणून घेतली होती. या रकमेपोटी साबळे यांनी संशयितांना दरमहा दहा टक्के व्याजदराने सुमारे ८ लाख ४५ हजार रूपयांची परतफेड केली मात्र तरीही संशयितांकडून उर्वरीत आठ लाखांसाठी तगादा सुरू आहे.
या सावकारांनी घरी येवून जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली, अंबड पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगून चौकशीसाठी यावे असा त्रास दिला.त्यानंतर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या सर्व सावकारांच्या जाचास कंटाळलेल्या हॉटेल मध्ये वेटर काम करणा-या व्यक्तीने पोलीसात धाव घेतली. अधिक तपास उपनिरीक्षक मोतीला ल पाटील करीत आहेत.