नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शरणपूर रोडवरील बेथलेनगर भागात तडिपार व त्याच्या कुटुंबियांची मोठी दहशत असल्याचे चित्र आहे. परिसरात दहशत कायम राहवी यासाठी संशयितांनी दोन कुटुंबियांना मारहाण करीत मायलेकींचा विनयभंग केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहन भंडारे,मायकल भंडारे व मोजेस भंडारे (रा.बेथलेनगर) अशी संशयितांची नावे असून त्यातील रोहन भंडारे हा तडिपार असल्याचे कळते. याबाबत परिसरातील तरूणीने याबाबत फिर्याद दिली आहे. भंडारे बापलेक गुरूवारी (दि.१३) रात्रीच्या सुमारास राज जितेंद्र विश्वास (२१) व त्याच्या मावशी काकास मारहाण करीत होते. यावेळी रोहन भंडारे याने युवतीस शिवीगाळ केल्याने तिने मोबाईल मध्ये व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला असता ही घटना घडली.
संतप्त संशयितानी युवतीचा मोबाईल फोडत तिचा विनयभंग केला. यावेळी संतप्त रोहनने बेल्टने तर वडिल आणि भावाने लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले असून, मुलीच्या बचावासाठी धावून आलेल्या तिच्या आईचेही या घटनेत कपडे फाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक टिपरे करीत आहेत.