नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकमध्ये चाळीस वर्षापूर्वीचे वर्गमित्र असलेल्या दोघा मित्रांनी तिसऱ्या मित्राच्या मेंदूवर क्लिष्ट शस्रक्रिया केली. या अनोख्या घटनेची नाशकात चर्चा असून डॉक्टरांच्या अनोख्या यारी-दोस्तीचे सध्या कौतुक केले जात आहे.
अधिक माहिती अशी की, एसएमबीटी हॉस्पिटलचे मेंदू व मणकेविकार तज्ञ डॉ. हितेंद्र गडकरी, भूलतज्ञ डॉ. पंकज गुप्ता व जिल्हा वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ. योगेश (नाव बदललेले) हे वर्गमित्र आहेत. डॉ. योगेश यांना गेल्या काही दिवसांपासून डोकेदुखी, तोल जाणे असा त्रास होत होता. त्यांनी जवळच्या एका डॉक्टरांना दाखवले व येथील डॉक्टरांनी त्यांना मेंदूचा एमआरआय करण्यास सांगितले. दरम्यान, मेंदूत गाठ असल्याचे या तपासणीमध्ये निष्पन्न झाल्यानंतर डॉ. योगेश यांनी मुंबई आणि पुण्यातील काही मेंदू आणि मणकेविकार तज्ञांचा सल्ला घेतला. येथील सर्वच डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन करावे लागेल याबाबत सांगितले.
डॉ. योगेश हे एसएमबीटी हॉस्पिटल येथे मेंदू व मणकेविकार तज्ञ म्हणून कार्यरत असलेले त्यांचे वर्गमित्र डॉ. हितेंद्र गडकरी यांच्याकडे आले. त्यांनी घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला. त्यांनतर डॉ. गडकरी यांनी त्यांच्या सर्व तपासण्या करण्यास सांगितल्या. यामध्ये ही गाठ काही प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास आले. त्यांना अॅकोस्टिक न्युरोमाची गाठ असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे लवकरात लवकर ही गाठ काढून टाकण्याचा सल्ला त्यांनी डॉ. योगेश यांना दिला.
कुठल्याही शस्रक्रीयेसाठी भूलतज्ज्ञाची भूमिका महत्वाची असते तर ही भूमिका कोण पार पाडणार? असा प्रश्न उपस्थित असताना डॉ. गडकरी यांच्या मदतीला नाशिकचे प्रख्यात भूलतज्ञ व भारतीय भूलतज्ञ असोसिएशनचे डॉ. पंकज गुप्ता धावून आले. योगायोग असा की. डॉ गुप्ता हेदेखील डॉ. गडकरी आणि डॉ योगेश यांचे वर्गमित्र असल्याने यारी-दोस्तीच्या या अनोख्या प्रसंगाची सुरुवात झाली. दोघा मित्रांसमोर आता तिसऱ्या डॉक्टर मित्रावर शस्रक्रिया करणे मोठे आव्हान होते. प्रत्येक व्यक्तीला जीवनात अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते. अशा वेळी मित्राचे महत्त्व वाढते. असे मित्र नेहमीच तुम्हाला धीर देतात आणि कठीण परिस्थितीतही तुमची साथ सोडत नाहीत.
मित्रांनी निर्णय घेतला की, डॉ योगेश यांच्यावर नाशकात शस्रक्रिया करून त्यांना लवकर यातून बाहेर काढू. शस्रक्रिया अतिशय क्लिष्ट होती पण मैत्रीची पकड मजबूत होती. सकाळी ९ वाजता सुरु झालेली शस्रक्रिया दुपारी तीनवाजेपर्यंत चालली. शस्रक्रिया यशस्वी झाल्याचे डॉ. गडकरी आणि डॉ गुप्ता यांनी बाहेर येऊन नातेवाईकांना सांगितले.
डॉ. योगेश यांना शुद्धीवर येण्यासाठी आणखी काही वेळ द्यावा लागणार असल्याने सर्वजण ते शुद्धीवर येईपर्यंत तिथेच थांबून होते. अखेर डॉ. योगेश शुद्धीवर आले आणि मैत्रीचा आनंदोत्सव या तिघांसह उपस्थित सर्वांनीच साजरा केला. या घटनेची माहिती सर्वदूर पोहोचताच अनेकांनी या अतूट मैत्रीचे कौतुक केले. गेल्या काही दिवसांपासून नाशकात या अनोख्या घटनेची चर्चा होताना दिसते आहे.
मित्रावर यशस्वी उपचार केल्याने या सेवेचे सार्थक झाल्याचा आनंद
मेंदू आणि मणकेविकारावर उपचार महागडे आहेत, परंतु एसएमबीटी हॉस्पिटल अशी एक जागा आहे, जिथे बहुतांश उपचार शासकीय योजनेअंतर्गत मोफत होतात तर योजनेत न बसणारे उपचार अतिशय माफक दरात होतात. गेल्या ३० पेक्षा अधिक वर्षापासून मेंदू आणि मणकेविकार उपचार मी करत आहे. दर महिन्यात माझ्या हातून ३०-४० मेंदू व मणकेविकार शस्रक्रिया होतात. आज एका मित्रावर यशस्वी उपचार केल्याने या सेवेचे सार्थक झाल्याचा आनंद आहे.
डॉ. हितेंद्र गडकरी, मेंदू आणि मणकेविकार तज्ञ, एसएमबीटी हॉस्पिटल
अशी झाली शस्रक्रिया
लहान मेंदूला चिकटलेली चार बाय तीन सेमीची मोठी गाठ होती. मेंदूतील महत्वाच्या नसांना चिकटलेल्या या गाठीला सोडवून क्युसा (CUSA) या अत्याधुनिक मशीनद्वारे संपूर्णपणे काढण्यास यश आले. या शस्रक्रियेनंतर रुग्णाला व्हेंटीलेटरवर ठेवण्याची गरज पडली नाही. एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये ब्रेन व स्पाईन एन्डोस्कोपिक सर्जरीच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांना मोफत उपचारांचा लाभ होणार असल्याचे डॉ. गडकरी म्हणाले.