नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शिखरेवाडीतील स्वामी समर्थ केंद्र परिसरात रस्त्यावर पडलेल्या वीस रूपयांची लालसा एका बांधकाम व्यावसायीकास चांगलीच भोवली आहे. पैसे उचलण्याच्या नादात दुचाकीस्वार भामट्यांनी तीन लाखाची रोकड असलेली बॅग हिसकावून नेली असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात बॅग लिफ्टींगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नरेंद्र प्रेमनारायण त्रिवेदी (रा.जेलरोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्रिवेदी बांधकाम व्यावसायीक असून शिखरेवाडीतील स्वामी समर्थ केंद्र परिसरात त्यांची माधुरी निवास नावाची नवीन साईट सुरू आहे. या बांधकाम साईटवर बुधवारी (दि.१८) सकाळी त्रिवेदी मजूरांचा पगार करण्यासाठी आले असता ही घटना घडली. साईटवर मजूर उपस्थित नसल्याने ते पैश्यांची बॅग घेवून आतील बांधकामाची पाहणी करीत होते. .यावेळी रस्त्यावरून कुणी तरी त्यांना आवाज दिला. पगार घेण्यासाठी मजूर आले असतील असे समजून ते साईट बाहेरील रस्त्यावर आले असता ही बॅग लिफ्टींग झाली.
सुनसान असलेल्या रस्त्यावर वीस रूपयांची नोट पडलेली असल्याने ते उचलण्यासाठी गेले होते. नोट उचलत असतांना पाठीमागून भरधाव डबलसिट आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या हातातील तीन लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून नेली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहेत.