नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वेगवेगळ्या भागात तीन विनयभंगाच्या घटना घडल्या. पहिल्या घटनेत शिक्षकाने विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला तर वेगवेगळया भागात राहणा-या दोन अल्पवयीन मुलींचे शोषण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत सरकारवाडा,सातपूर व आडगाव पोलीस ठाण्यात विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विज्ञान शाखेचे शिक्षण घेणारी युवती रविवारी (दि.१२) कॅनडा कॉर्नर भागात शिकवणीसाठी गेली होती. खासगी क्लासमध्ये शिकविण-या दिनेश जाधव नामक शिक्षकाने तिचा विनयभंग केला. फिजिक्स विषय शिकविणा-या शिक्षकाने विद्यार्थीनी वर्गात एकटी असल्याची संधी साधत हे कृत्य केले. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.
दुसरी घटना सातपूर येथे घडली. गौरव रवी गायकवाड (२१) या संशयिताने आपल्या अल्पवयीन मैत्रीणीवर वेळोवेळी बलात्कार केला. मैत्रीणीस समाजात बदनामी करण्याची धमकी देत संशयिताने हे कृत्य केले असून याबाबत मुलीने आपल्या कुटूंबियांकडे वाच्यता केल्याने ही घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसरी घटना आडगाव शिवारात घडली. सतरा वर्षीय मुलाने आपल्या सोसयटीत राहणा-या अल्पवयीन मुलीस मोबाईल मधील व्हिडीओ कुटुंबियांना दाखविण अशी धमकी देत हे कृत्य केले. पार्किंगमध्ये घेवून जात त्याने जबरदस्ती केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक निखील बोंडे करीत आहेत.