नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरधाव एसटीने दिलेल्या धडकेत ३९ वर्षीय सायकलस्वार ठार झाला. हा अपघात त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमी समोर झाला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तेज बहादूर महारा (३९ रा.विकास कॉलनी,महात्मानगर) असे मृत सायकलस्वाराचे नाव आहे. महारा रविवारी (दि.१५) सायंकाळच्या सुमारास त्र्यंबकरोडने आपल्या सायकलवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. पोलीस अकादमीसमोर भरधाव त्र्यंबकेश्वर पेठ एमएच १५ एन ८८२२ या बसने सायकलला धडक दिली.
या अपघातात महारा यांना गंभीर दुखापत झाल्याने जिल्हा रूग्णालया मार्फत त्यांना सिध्दीविनायक हॉस्पिटल येथे हलविले असता उपचारापूर्वी डॉ.संदेश पाटील यांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार जयवंत बागुल करीत आहेत.
तडिपारास पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावरणा-या तडिपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. खडकाळी भागात शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने संशयिताच्या मुसक्या आवळल्या असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरबाज उर्फ सोनू रफिक बेग (रा.आंबेडकर पुतळयामागे पंचशिलनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे. बेग याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमिवर शहर पोलीसांनी त्याच्यावर हद्दपारीची कारवाई केली आहे. शहर व जिह्यातून त्यास दोन वर्षासाठी हद्दपार केलेले असतांनाही त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसाना मिळाली होती.
पोलीस त्याच्या मागावर असतांना तो रविवारी (दि.१५) दुपारी खडकाळी सिग्नल भागात मिळून आला. याबाबत अंमलदार अमोल कोष्टी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार जुंद्रे करीत आहेत.