नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांत घेतलेले महत्त्वाचे निर्णय आणि कामगिरीची माहिती देण्यासाठी केंद्रीय गृह मंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेला संबोधित केले. या प्रसंगी अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 100 दिवसांतील महत्त्वाच्या यशाची माहिती देणारी ‘विकसित भारताच्या दिशेने मार्गक्रमण’ अशा आशयाचे शीर्षक असलेली विशेष पुस्तिका आणि आठ फ्लायर्सचे प्रकाशन केले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण, रेल्वे, तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव या कार्यक्रमाला उपस्थित होते.
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना केंद्रीय गृह मंत्री आणि सहकार मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज त्यांच्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या. गरीब कुटुंबात जन्म घेतलेले, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी यांना 15 विविध राष्ट्रांनी आपल्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केले असून त्यांचा आणि देशाचा अभिमान वाढवला आहे.
केंद्रीय गृह मंत्री म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने गेल्या 10 वर्षांत देशाची अंतर्गत, बाह्य सुरक्षा आणि संरक्षण व्यवस्था बळकट करून सुरक्षित देश घडवण्यात मोठे यश मिळवले आहे. ते म्हणाले की पंतप्रधान मोदी यांनी शिक्षणात मूलगामी बदल घडवून आणण्याचे कार्य केले आहे आणि आपली प्राचीन शैक्षणिक मूल्ये, समृद्ध भाषा आणि आधुनिक शिक्षणाचे एकात्मिकरण करणारे नवे शैक्षणिक धोरण आणले आहे. त्यांनी सांगितले की संपूर्ण जगात आज उत्पादन उपक्रमांसाठी भारत सर्वाधिक प्राधान्य दिला जाणारा देश ठरला आहे.गृह मंत्री म्हणाले की गेल्या 10 वर्षांत स्वातंत्र्यानंतर प्रथमच भक्कम परराष्ट्र धोरणाची आखणी झाली आहे.
अमित शाह यांनी सांगितले की गेल्या 10 वर्षांत मोदी सरकारने घरे, शौचालये, गॅस जोडण्या, पेयजल, वीज, दरमहा 5 किलो धान्य आणि 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य सुविधा देशातील 60 कोटी गरीब लोकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. ते म्हणाले की आगामी 5 वर्षांत देशात प्रत्येकाकडे स्वतःचे घर असेल असे ध्येय आम्ही बाळगले आहे.केंद्रीय गृह मंत्री म्हणाले की अनेक योजना आपल्या शेतकऱ्यांचा विकास आणि समृद्धी लक्षात घेऊन आणल्या आहेत.
मोदी सरकार 3.0 च्या कार्यकाळाचे पहिले 100 दिवस ‘विकसित भारत’च्या निर्मितीसाठी मजबूत पाया रचणारे आहेत, असे अमित शहा याप्रसंगी म्हणाले. हे 100 दिवस म्हणजे प्रत्येक घटकाला सामावून घेऊन विकास आणि गरीब कल्याणाचा अद्भुत समन्वय करणारे आहेत, असेही ते म्हणाले. मोदी सरकार 3.0 च्या पहिल्या 100 दिवसांत सुमारे 15 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. मोदी सरकार सुरक्षा, विकास आणि गरीब कल्याणासाठी समर्पित भावनेने काम करत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या 100 दिवसांची 14 स्तंभांमध्ये विभागणी करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. या 100 दिवसांत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 3 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील वाढवण येथे 76 हजार कोटी रुपये खर्चून एक मेगा पोर्ट बांधण्यात येणार असून, पहिल्या दिवसापासून या बंदराचा जगातील सर्वोत्कृष्ट 10 बंदरांमध्ये समावेश होणार आहे, असे त्यांनी सांगितले. आजवर कधीही रस्त्याने जोडली गेली नाहीत अशी 25 हजार गावे रस्त्याने जोडण्याची सुमारे 49 हजार कोटी रुपये खर्चाची योजना सुरू करण्यात आली. तर, 50,600 कोटी रुपये खर्चून भारतातील प्रमुख मार्गांचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे शहा यांनी नमूद केले. वाराणसीतील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ, पश्चिम बंगालमधील बागडोगरा, बिहारमधील बिहता येथील विमानतळांचे अद्यतनीकरण करण्यासह अगाट्टी आणि मिनीकॉयमध्ये नवीन हवाई पट्ट्या बांधून पर्यटनाला चालना देण्यासाठी काम केले जात आहे, असे ते म्हणाले. या 100 दिवसात बेंगळुरू मेट्रो फेज-3, पुणे मेट्रो, ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो आणि इतर अनेक मेट्रो रेल्वे प्रकल्पांनीही प्रगती केली आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 17 व्या हप्त्याअंतर्गत 9.50 कोटी शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत, असे अमित शहा यांनी नमूद केले.मक्यापासून इथेनॉल तयार करण्यासाठी सहकारी साखर कारखान्यांच्या इथेनॉल उत्पादक युनिट्सचे मल्टी-फीड इथेनॉल युनिटमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. यामुळे आता केवळ उसापासूनच नव्हे तर मक्यापासूनही इथेनॉल तयार करता येणार आहे, असेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले.या 100 दिवसांत मध्यमवर्गीयांना अनेक दिलासा देणारे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. कर सवलती अंतर्गत, 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही प्राप्ती कर लागणार नाही, हा त्यापैकी एक निर्णय असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.2024 मध्ये आतापर्यंत, प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत 2.5 लाखांहून अधिक घरांपर्यंत सौरऊर्जा पोहोचली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.मुद्रा कर्जाची मर्यादा 10 लाख रुपयांवरुन वाढवून 20 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे, आणि ज्यांनी आपल्या जुन्या कर्जाची यशस्वी परतफेड केली आहे त्यांना याचा फायदा होईल, हे अमित शहा यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही देशाच्या विकासासाठी सक्षम तरुण ही मूलभूत अट आहे, असे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री म्हणाले. सरकारने 2 लाख कोटी रुपयांचे प्रधानमंत्री पॅकेज जाहीर केले आहे, ज्या अंतर्गत पुढील 5 वर्षात 4 कोटी 10 लाख तरुणांना लाभ पोचणार आहे, असे ते म्हणाले. आमच्या सरकारने शीर्ष कंपन्यांमध्ये एक कोटी तरुणांना अंतर्वासिता संधी, भत्ते आणि एकवेळ मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारमधील नोकऱ्यांसाठी हजारो नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या आहेत, असे शहा यांनी नमूद केले.
शाह म्हणाले की, भांडवली खर्च 11 लाख 11 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवणे हा एक मैलाचा दगड आहे. यामुळे तरुणांसाठी अनेक रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि आपल्या पायाभूत सुविधाही मजबूत होतील.अमित शहा म्हणाले की, दीनदयाल अंत्योदय योजनेअंतर्गत 10 कोटींहून अधिक महिलांना संघटित करून 90 लाखांहून अधिक स्वयंसहायता गट स्थापन करण्यात आले असून लखपती दीदी या योजनेअंतर्गत 100 दिवसांत 11 लाख नवीन लखपती दीदींना प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियानांतर्गत 63,000 आदिवासी गावांचा पूर्ण विकास केला जाईल. यामुळे 5 कोटी आदिवासींची आर्थिक स्थिती सुधारेल.शहा म्हणाले की, वक्फ सुधारणा विधेयक-2024 हे वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन, संरक्षण आणि गैरवापर रोखण्यासाठी कटिबद्ध असून ते येत्या काही दिवसांत संसदेत मांडले जाईल.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, वैद्यकीय महाविद्यालयात 75,000 नवीन वैद्यकीय जागा वाढवून आम्ही वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशावरील अवलंबित्व संपवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत.150 वर्षांहून अधिक जुन्या ब्रिटीशांनी बनवलेल्या कायद्यांऐवजी,भारतीय न्याय संहिता (BNS), भारतीय नागरीक सुरक्षा संहिता (BNSS) आणि भारतीय साक्ष अधिनियम (BSA) – हे तीन नवीन कायदे 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आले आहेत,असे गृहमंत्र्यांनी सांगितले. 3 वर्षात या कायद्यांची पूर्ण अंमलबजावणी झाल्यानंतर भारताची फौजदारी न्याय प्रणाली जगातील सर्वात आधुनिक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमित शहा म्हणाले की, 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेऊन येणाऱ्या पिढ्यांना जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून देशाला पुन्हा आणीबाणीच्या अंधारात जावे लागू नये.मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसात आम्ही इतके कार्य करू शकलो आहोत, असे अमित शहा म्हणाले.ते म्हणाले की, यामागचे कारण म्हणजे जेव्हा सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीमध्ये व्यस्त होते, त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मात्र निवडणूकांच्या 6 महिने आधी नोकरशाहीला काम दिले होते की जी विकास कामे आखणीच्या टप्यात आहेत, ती जे नवे सरकार येईल त्यासाठी पूर्ण करून ठेवायची आहेत जेणेकरून देशाच्या विकासाच्या गतीला अडथळा येणार नाही. या विचारसरणीमुळेच 100 दिवसांत लाखो-कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लावण्यात यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.