नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– कपडे धुतले नाही या कारणातून पती व सासूने विवाहीतेवर विषप्रयोग केल्याचा प्रकार देवळाली गावात घडला. महिलेवर जयराम हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून तिच्या जबाबावरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या बुधवारी (दि.२) दुपारच्या सुमारास जगतापमळा भागात ही घटना घडली. विवाहीतेच्या नणंदने आपल्या माहेरी कपडे धुण्यासाठी आणले होते. हे कपडे धुण्यास विवाहीतेने नकार दिल्याने मायलेकाने तिला मारहाण केली. यावेळी संतप्त दोघांनी तिला बळजबरीने विष पाजले.
महिलेस त्रास होवू लागल्यानंतर तिच्या पतीनेच तिला रूग्णालयात दाखल केले असून तिच्या प्रकृर्तीत सुधारणा झाल्यानंतर तिने दिलेल्या जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सपकाळ करीत आहेत.
दहशत निर्माण करणा-या पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– धारदार कोयत्याचा धाकदाखवित दहशत निर्माण करणा-या एकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयिताच्या ताब्यातून कोयता हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली.
निखील गोपाळसिंग परदेशी (३१ रा.परदेशी चाळ,हनुमानवाडी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित कोयताधारीचे नाव आहे. याबाबत युनिट १ चे हवालदार भांड यांनी फिर्याद दिली आहे. हनुमानवाडीतील राका लॉन्स भागात एक तरूण कोयत्याचा धाक दाखवित परिसरात दहशत निर्माण करीत असल्याची माहिती पथकास मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.७) रात्री धाव घेत पथकाने संशयिताच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्या ताब्यातून कोयता हस्तगत करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार भोईर करीत आहेत.