नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बालिकेचे लैंगिक शोषण करणार्या आरोपीला नाशिक न्यायालयाने दहा वर्षांचा सश्रम कारावास आणि एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी दंड भरु न शकल्यास दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. अक्षय किसन चौधरी (वय २७, रा. पंचशीलनगर, शिवाजीनगर, पुणे रोड, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी अक्षय चौधरी याने २ सप्टेंबर २०१९ रोजी पंचशीलनगर परिसरात हा गुन्हा केला होता. अल्पवयीन मुलगी मैत्रिणीच्या घराकडून स्वत:च्या घरी जात होती. त्याचवेळी अक्षयने या मुलीला सांगितले की मी तुला घरी पोहोचवितो. त्यानंतर त्याने या मुलीला एका घरात घेऊन गेला. तेथे जबरदस्तीने तिचे लैंगिक शोषण केले. याबाबत कोणास काही सांगितले, तर जीवे ठार मारीन, अशी धमकी दिली. त्यानंतर या मुलीने हा प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर अक्षय विरोधात उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी उपनगर पोलीस स्टेशनचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी यांनी तपास केला. तसेच, न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या खटल्याचे कामकाज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तथा विशेष पोक्सो न्यायालयात चालले. न्यायमूर्ती एस. एस. खरात यांनी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ चे कलम ४ अन्वये आरोपी अक्षय यास दोषी ठरविले. तसेच, दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीमती अपर्णा पाटील यांनी काम पाहिले.