नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून टोळक्याने हातात कोयता आणि चॉपर घेऊन रात्री सिडकोत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाही तर वाहनांच्या काचाही फोडण्यात आल्या. नगरसेवकाचे दुकानही फोडण्यात आले. याप्रकरणामुळे सिडकोवासीय भयभीत झाले असून नाशिक पोलिस काय करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभम पार्क येथे बुधवारी रात्री तीन ते चार जणांच्या टोळक्याने हातात कोयता व चॉपर घेऊन दहशत माजवीत रस्त्यावर लावण्यात आलेल्या चार चाकी वाहनांचे नुकसान केले. याबरोबरच भाजपाच्या विद्यमान महिला नगरसेवक छाया देवांग यांच्या मालकीच्या दुकानाच्या देखील काचा फोडण्यात आल्या. या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये घबराट पसरली. दरम्यान घटना कळताच अंबड पोलिस ठाण्याचा फौज फाटा घटनास्थळी पोहोचताच दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नाशिक महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांकडून दहशत पसरवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यामुळे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. शुभमपार्क परिसरात नेहमीच वर्दळ असते. याच परिसरात तीन ते चार जणांच्या टोळक्याने हातात धारदार शस्त्र घेत परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. याचवेळी त्यांनी सुमारे सात ते आठ चारचाकी वाहनांचे नुकसान केले. तसेच या वाहनांमधील एकास बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान, अंबड पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. शुभम पार्क परिसरात टोळक्याने दहशत असल्याने अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर पोलीस फौजफाटासह घटनास्थळी काही वेळातच पोहचले. यावेळी संशयित पसार होण्याच्या आधीच यातील दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये अविनाश गायकवाड (रा शुभम पार्क) व सोनू खिरडकर (रा. स्वामी नगर, अंबड) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा नगरसेविका प्रतिभा पवार, छाया देवांग, निलेश ठाकरे, भुषण राणे, आबा पवार आदींसह वाहन चालकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
शुभम पार्क परिसरात एका माजी नगरसेवकाच्या मालकीचे वाईन शॉप असून आहे .त्या वाईन शॉप मध्ये दारू विकत घेत मद्यपी दुकानाच्या समोरच मद्य पिऊन धिंगाणा घालण्याचे प्रकार कायम करत असतात . त्यामुळे सदरचे वाईन शॉप नागरी वस्तीतून हटविण्यात यावे अशी मागणीही यावेळी महिला वर्गाकडून करण्यात आली. शुभम पार्क परिसरात टोळक्याने वाहनांची नासधूस केल्याने परिसरातील नागरिकांनी थेट पोलिस ठाणे गाठले पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली झाली होती यावेळी भाजपच्या महिला नगरसेवकां सह परिसरातील नागरिकांनी गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी केली होती .