नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महापालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयातील जाहिरात व परवाना विभागाचा लिपीक आणि शिपाई दोघेही लाच घेताना जाळ्यात सापडले आहेत. राजू उत्तम वाघ (वय 48 लिपिक तथा प्रभारी कार्यालय अधीक्षक) आणि प्रवीण अर्जुन इंगळे (वय 42, शिपाई) अशी त्यांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक शहरात चहा टपरी चालविणाऱ्याने हॉकर्स झोन मध्ये बायोमेट्रिक नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणीसाठी आणि त्याची पावती देण्यासाठी संबंधित चहा विक्रेत्याकडे वाघ आणि इंगळे यांनी ५ हजार रुपयांची लाच मागितली. अखेर तडजोडी अंती १८०० रुपयांची लाच स्वीकारण्याचे त्यांनी मान्य केले. त्यानंतर यासंदर्भात एसीबीकडे तक्रार करण्यात आली. एसीबीचे पथकाने सापळा रचला. वाघ आणि इंगळे या दोघांनी महानगरपालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन या कार्यालयाच्या मुख्य गेट जवळील पार्किंग मध्ये १८०० रुपयांची रक्कम स्विकारली. यावेळी एसीबीच्या पथकाने वाघ आणि इंगळे यांना रंगेहाथ पकडले. आता या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, लाच देणे आणि घेणे गुन्हा आहे. त्यामुळेच कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.
Nashik Crime Bribe Trap ACB Raid NMC