नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बहुचर्चित म्हसरूळ येथील विद्यार्थीनी लैंगिक शोषण प्रकरणात कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या हर्षल मोरे याचा पुन्हा म्हसरूळ पोलिसांनी ताबा घेतला असून, त्यास दुसऱ्या गुन्ह्यात बुधवार (दि.१४) पर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. पहिल्या गुह्याच्या तपासात त्याच्या घरात मिळून आलेल्या एअर गनचा धाक दाखवत त्याने हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय असून, त्याबाबतच्या तपासासाठी त्यास पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
म्हसरूळ येथील द किंग फाऊंडेशन संचलित गुरुकूल आधारश्रमातील लैंगिक शोषण प्रकरण गेल्या महिन्यात समोर आले आहे. एका पिडीतेने पोलिसात धाव घेतल्याने या प्रकरणात तब्बल सात अल्पवयीन विद्यार्थींनींचे संशयित संस्थाचालक हर्षल मोरे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकरणाचा उलगडा झाला आहे. याप्रकरणी वेगवेगळे सात गुन्हे दाखल करण्यात आले असून पहिल्या गुन्ह्यात पोलिसांनी चौदा दिवसांच्या कोठडीत मोरे याच्या कृरकृत्याचा भांडाफोड केला. या काळात पोलिसांनी त्याच्यासह ज्ञानदीप गुरूकुल आश्रमाच्या विश्वस्तांची कसून चौकशी केली आहे. मोरे याच्या शहरातील आणि मूळ गाव असलेल्या सटाणा येथील घरझडतींसह पीडिता आणि नातेवाईकांची जबाब नोंदविले आहे.
सटाणा येथील घरझडतीत पोलिसांच्या हाती एअर गन लागली आहे. मात्र तत्पूर्वीच कोर्टाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यास कारागृहात रवाना करण्यात आले होते. परंतू पोलिसांनी बुधवारी (दि.७) पुन्हा त्याचा ताबा घेतला आहे. या गनचा धाक दाखवित त्याने पिडीतांवर बलात्कार केल्याचा संशय पोलिसांना असून त्याबाबत आज न्यायालयात बाजू मांडण्यात आली. सरकारी वकील अॅड सुधीर कोतवाल यांनी संशयित मोरेच्या राहत्या घरी एअरगन मिळाली असून, त्याचा धाक दाखवून त्याने विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा संशय आहे. त्याकामी पोलिसांना अधिक चौकशी व सखोल तपास करायचा असल्याचे तसेच या प्रकरणात अनेक साक्षीदार समोर येत असल्याचा युक्तीवाद केल्याने न्यायालयाने संशयितास पुन्हा सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Nashik Crime Adharashram Accused Harshal More Investigation
Police Rape Molestation Minor Girls