नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विशेष मोक्का न्यायालयाने सोनेरी टोळीला पाच वर्षाचा सश्रम कारावास व प्रत्येकी सव्वा पंधरा लाखाचा दंड सुनावला आहे. मौजमजेसाठी संघटीतपणे चैनस्नॅचिंग करणा-या तीन मित्रांना ही शिक्षा सुनावली आहे. गेल्या काही वर्षापासून या तिघांनी संघटीतपणे चैनस्नॅचिंगचे गुन्हे केले होते. ते समोर आल्याने न्यायालयाने लाखोंच्या आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सोमनाथ हिरामण बर्वे (३० रा.मुंगसरारोड चांदशी ता.जि.नाशिक),नितीन जिवाजी पारधे (२५ रा.फुलेनगर,पेठरोड) व अनिल भावराव पवार (२५ रा.सय्यद पिंपरी ता.जि.नाशिक) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पुणे येथील स्वाती विजय परमेश्वरे (रा.नानापेठ,एनडी कॅम्प चौक पुणे) या २२ एप्रिल २०१९ रोजी विवाह सोहळयानिमित्त शहरात आल्या होत्या. औरंगाबादरोडवरील नारायण लॉन्स येथे विवाह सोहळा आटोपून त्या रात्री अकराच्या सुमारास लॉन्सच्या प्रवेशद्वारातून कारच्या दिशेने पायी जात असतांना ही चैनस्नॅचिंग झाली होती.
दुचाकीवरील त्रिकुटाने त्यांच्या गळयातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या असता त्यांनी गेल्या काही वर्षापासून संघटीतपणे चैनस्नॅचींगचे गुन्हे केल्याचे समोर आल्याने या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली. या गुह्याचा तपास तत्कालीन उपायुक्त विजय खरात व सहाय्यक आयुक्त समिर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पी.बी.पालकर यांनी केला. त्यांना हवालदार शरद सोनवणे यांनी मदत केली.
हा खटला कोर्ट क्रमांक २ चे जिल्हा व सत्र न्यायालयाच न्या. एन.व्ही.जिवणे यांच्या समोर चालला. सरकारतर्फे अॅड.डॉ.सुधीर कोतवाल यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार,पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अमलदारानी सादर केलेल्या परिस्थीतीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपींना महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये प्रत्येकी पंधरा लाख रूपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांचा कारावास तर जबरीचोरीच्या गुह्यात पाच वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी २५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.