नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – थकित कर्जाच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी एम.आर.देवरे यांनी केलेल्या फौजदारी प्रकरणात आरोपीला एक महिन्याचा कारावास व दीड लाख रूपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.एन.सरक यांनी ठोठावली.
आरोपी राजाराम मालजी बोरसे, रा.सिडको याने श्रीमती एम.आर.देवरे (सावकारी परवानाधारक) यांच्याकडून एक लाख रूपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड मुदतीत केली नसल्यामुळे आरोपीकडे कर्जाची थकबाकी झाली. फिर्यादीनी कर्जाच्या परतफेडीसाठी तगादा लावल्यामुळे आरोपीने कॉर्पोरेशन बँकेच्या इंदिरानगर शाखेचा १ लाख रूपयांचा धनादेश १२ जूलै २०१७ रोजी फिर्यादीस दिला होता. फिर्यादीनी तो धनादेश वटवण्यासाठी बॅंकेत पाठवला असता १५ जूलै २०१७ रोजी आरोपीच्या आरोपीच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसल्यामुळे परत आला. त्यानंतर फिर्यादीनी आरोपीला नोटीसीद्वारे पैशाची मागणी केली असता, आरोपीने नोटीस प्राप्त होऊनही त्याची पूर्तता केली नाही. त्यामुळे फिर्यादीने आरोपींविरुद्ध धनादेश न वटल्याबाबत तक्रार दाखल केली. त्यासंबंधीचे पुरावे कोर्टात सादर करण्यात आले.
दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर कोर्टाने आरोपी राजाराम बोरसे यांना एक महिन्याची सक्तमजुरी कैदेची शिक्षा ठोठावली आहे. तसेच चेकची रक्कम रूपये १ लाख व खर्च भरपाई म्हणून रूपये ५० हजारांचा असा एकूण दीड लाख लाखांचा दंड केला आहे. सदर दंडाची रक्कम तीन महिन्याचे आत द्यावी असा आदेश देवून रक्कम भरण्यास कसूर केल्यास अजून १५ दिवस जास्तीची साधी कैदेची शिक्षा ठोठावली आहे. फिर्यादीतर्फे अॅड. दिपक ताजनपुरे व अॅड अंकुश निकम यांनी काम पाहिले.
Nashik Court Legal Cheque Bounce Punishment