नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरासह जिल्ह्यात लाचखोरीला ऊत आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच एकाच दिवसात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ३ वेगवेगळ्या सापळ्यांमध्ये ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर, दोन दिवसांमध्ये एसीबीने ४ सापळ्यांमध्ये ६ जणांना लक्ष्य केले आहे.
येवलाः कनिष्ठ लिपीकाला ४ हजाराची लाच घेताना अटक
येवला येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपीक रणजित शिवसिंग गोशिंगे याला ४ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेत जमिनीसंदर्भातील हुकुमनामा काढून देण्यासंदर्भात गोशिंगे याने ४ हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) यासंदर्भात तक्रार करण्यात आली. त्याची दखल घेत सापळा रचण्यात आला. अखेर गोशिंगे दुय्यम निबंधक कार्यालयातच ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास एसीबीचे पथक करीत आहे. दरम्यान, लाच देणे आणि घेणे हा गुन्हा असून याप्रकरणी तक्रार देण्यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कळवणः कोतवाल आणि तलाठ्याविरोधात गुन्हा दाखल
लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) आडगाव पोलिस स्टेशनच्या हवालदारावर लाच घेतल्याप्रकरणी काल गुन्हा दाखल केला. त्यातच आज भद्रकाली पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस नाईक यांनाही रंगेहाथ पकडले. त्यातच आज दिवसभरातच एसीबीने आणखी एका सापळ्यात कळवण तालुक्यातील तलाठी आणि कोतवाल यांना पकडले आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, कळवण तालुक्यातील गोसराणे येथील तलाठी राधा दिनकर महाले-पालवी आणि जयदर येथील कोतवाल पोपट काळुराम भोये या दोघांना ३५ हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे. वाळूच्या ट्रॅक्टरवर कारवाई करु नये, वाहतूक सुरळीत रहावी यासाठी ही लाच मागण्यात आली होती. या दोघांनी लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक शहरः २० हजाराची लाच घेताना APIसह पोलिस नाईक ताब्यात
भद्रकाली पोलिस स्टेशनमधील सहायक पोलिस निरीक्षक प्रणिता दीपक पवार आणि पोलिस नाईक तुषार मधुकर बैरागी हे २० हजार रुपयांची लाच घेताना सापडले आहेत. एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि न्यायालयात लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्यासाठी या दोघांनी २० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार करण्यात आली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. अखेर प्रणिता पवार आणि तुषार बैरागी यांनी भद्रकाली पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तिवंधा पोलिस चौकीत २० हजार रुपयांची रक्कम स्विकारली. त्यामुळे एसीबीच्या पथकाने तातडीने त्यांना ताब्यात घेतला. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
नाशिक शहरः २० हजाराची लाच घेताना हवालदारावर गुन्हा
आडगाव पोलिस स्टेशनमधील राजेश थेटे याला २० हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. याची गंभीर दखल पोलिस आयुक्तांनी घेतली आहे. त्यामुळेच आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.