नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक मध्ये अपुऱ्या सीएनजी पुरवठ्या बाबत व विविध अडचणीबाबत संसदीय पेट्रोलियम व नॅचरल गॅस समिती राष्ट्रीय अध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या दालनात माजी आमदार जयवंतराव जाधव व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सीएनजीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक लावली होती. यावेळी सीएनजीचा सुरळीत पुरवठा करण्याच्या सुचना खा. सुनिल तटकरे यांनी MNGL चे नाशिक विभाग मुख्य श्री.संदिप श्रीवास्तव यांच्यासह अधिकाऱ्यांना दिल्या.
नाशिक जिल्ह्यात एमएनजीएल प्रकल्प आल्यावर सर्व पेट्रोल पंप चालक व ग्राहक आनंदित झाले होते. काही पंपांवर सीएनजी चालू झाल्यानंतर लवकरच बऱ्याच ठिकाणी सीएनजी पुरवठा चालू होईल व ग्राहकांची सोय होईल असे चित्र उभे राहिले. बऱ्याचशा पंपांनी ग्राहक सेवेसाठी ट्रांसफार्मर घेणे, लोड वाढवणे व इतर अनुषंगिक खर्च केला व गुंतवणूक केली परंतु ती फोल ठरली. साधनसामुग्री असताना देखील सीएनजीच्या तुटवड्यामुळे अनेक पंपाना पुरवठा केला गेला नसल्याने विक्री सुरू करता आली नाही. नाशिक मध्ये CNG चा पुरवठा सुरळीत होत नसल्याने ग्राहकांपाठोपाठ पेट्रोल पंप चालकही वैतागले आहेत. MNGL कडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने पंप चालकांनी बंदचा इशारा दिला होता. नाशिक मध्ये ठराविक पंपावरच सीएनजी गॅसची विक्री होते. वाहनधारक सकाळ पासून रांगेत लागून त्यांना साधारणपणे २ तासानंतर गॅस मिळतो. सुट्टीच्या दिवशी ३ ते ४ तास वेळ वाया जात असल्याचे चित्र नाशिक मध्ये आहे.
गॅस पुरवठा होत नसल्याने अनेक पंपावर गॅस शिल्लक नसल्याचे फलक दिसतात. परंतु नाशिकमधील एमएनजीएलच्या मालकीचे तीनही पंप अहोरात्र सुरू असतात. यामुळे पंप चालक व ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे तक्रारी यावेळी बैठकीत केल्या. यावेळी संसदीय पेट्रोलियम व नॅचरल गॅस समिती राष्ट्रीय अध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी नाशिककरांच्या सर्व अडचणी जाणून गॅस वाहतुकीचे टॅंकर वाढवून मुंबई- नाशिक गॅस पाईपलाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सुचना MNGL चे नाशिक विभाग मुख्य श्री.संदिप श्रीवास्तव यांच्यासह अधिकाऱ्यांना दिल्या.