नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका जिवंत व्यक्तीला मृत घोषित करण्यात आले. हा रुग्ण जळीत कक्षामध्ये उपचार घेत होता. हा रुग्ण काही वेळाने उठून बसल्याने संपूर्ण कक्षातच खळबळ पसरली. नंतर स्पष्ट झाले की, प्रशिक्षणार्थी डॉक्टरने या रुग्णाला मृत घोषित केले होते.
हा रुग्ण ९३ टक्के भाजला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. जिवंत असूनही मृत घोषित करण्याच्या या प्रकारामुळे रुग्णाच्या नातेवाईकांसह हॉस्पिटलमध्येच खळबळ उडाली. अकेर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी दिले आहेत. दरम्यान, रात्री उशिरा या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
काय आहे हा प्रकार
शहरातील अशोकस्तंभ परिसरात राहणाऱ्या व्यावसायिकाने सोमवारी (२२ मे) दुपारी स्वतःला पेटवून घेतले. त्यात तो ९३ टक्के भाजला. त्याला काकडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्याच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी (२५ मे) सकाळच्या सुमारास या रुग्णाची कोणतीही हालचाल होत नव्हती. त्यानंतर प्रशिक्षणार्थी डॉक्टरने वैद्यकीय तपासणी केली. तसेच, या रुग्णाचा इसीजी रिपोर्ट हा निरंक आला. त्यामुळे या रुग्णाचे निधन झाल्याचे घोषित करण्यात आले.
नंतर उठून बसला
रुग्णाला मृत घोषित झाल्याने हॉस्पिटल व्यवस्थानाने पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास प्रारंभ केला. मात्र, सकाळी ९ वाजेच्या सुमारास या रुग्णाची मंद हालचाल होत असल्याचे वॉर्डमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दिसून आले. त्यानंतर या रुग्णाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. काही वेळाने तर तो उठून बसला. अखेर तो जिवंत असल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले. त्यामुळे नातेवाईंकांना आनंद झाला खरा पण त्यांनी वैद्यकीय विभागाची खरडपट्टी काढण्यास प्रारंभ केला.
अखेर या रुग्णाचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला आहे. या रुग्णाला श्वास घेण्यात अडचणी येत होत्या. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
Nashik Civil Hospital Patient Death Case